सांगलीत कृष्णाकाठी मराठा महालाट...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

सांगली - इंग्रज सरकारला प्रतिसरकार उभारून स्वातंत्र्याची पहाट दाखवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून येथे सकल मराठा क्रांती मोर्चाला सुरवात झाली. चारही दिशांना मंगळवारी विराट भगवा जनसागर उसळला होता. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे हातात घेतलेला मराठा बांधव दिसत होता. पाहावे तिकडे गर्दीने भरलेले रस्ते अन्‌ चौक... महिला, तरुण-तरुणी, विद्यार्थिनींच्या लक्षणीय उपस्थितीसह लाखोंच्या सहभागाने हा मोर्चा सुरू झाला. सकाळी सात वाजल्यापासूनच मराठा बांधव हजारोंच्या जथ्याने मोर्चाच्या प्रवाहात सहभागी होत होते.

सांगली - इंग्रज सरकारला प्रतिसरकार उभारून स्वातंत्र्याची पहाट दाखवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून येथे सकल मराठा क्रांती मोर्चाला सुरवात झाली. चारही दिशांना मंगळवारी विराट भगवा जनसागर उसळला होता. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे हातात घेतलेला मराठा बांधव दिसत होता. पाहावे तिकडे गर्दीने भरलेले रस्ते अन्‌ चौक... महिला, तरुण-तरुणी, विद्यार्थिनींच्या लक्षणीय उपस्थितीसह लाखोंच्या सहभागाने हा मोर्चा सुरू झाला. सकाळी सात वाजल्यापासूनच मराठा बांधव हजारोंच्या जथ्याने मोर्चाच्या प्रवाहात सहभागी होत होते. मुली, महिलांची हजेरी लक्षवेधी ठरली आणि मोर्चाने येथेही इतिहास रचला. 

सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा मोर्चा म्हणून त्याची चर्चा रंगली आहे. कोपर्डी (जि. नगर) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर या मोर्चाने लक्ष वेधले. नेतृत्वासाठी नसलेला कुठलाही विशिष्ट चेहरा हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. मारुती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मारुती रोड, आयर्विन पुलावरून जणू काही भगवे वादळ शहरात धडकत होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक झेंडे, बॅनर घेऊन टी-शर्ट, टोप्या घालून आले. दुपारपर्यंत हे वादळ शहरात घोंघावत राहिले. यातून मराठा समाजाचा दबलेला हुंकार आज स्पष्टपणे जाणवत होता.

निर्भयाच्या आठवणीने सर्वच हेलावले

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आल्यानंतर कोपर्डीची निर्भया, आत्महत्या केलेले शेतकरी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी कोपर्डीच्या निर्भयाचे नाव घेताच संपूर्ण मोर्चा त्या अमानवी अत्याचाराच्या कटू आठवणीने हेलावून गेला. लाखोंच्या संख्येने असलेल्या जनसमुदायात श्रद्धांजलीवेळी एकच शांतता पसरली होती.

लेकी, भगिनी, मातांना विश्‍वास देणारा मोर्चा

हा मोर्चा मराठा समाजातील लेकी, भगिनी, मातांना खऱ्या अर्थाने विश्‍वास देणारा ठरला. मोर्चात सहभागी झालेला प्रत्येक माणूस महिलांचं अतिशय आदरपूर्वक स्वागत करत होता, त्यांना रस्ता करून देत होता, पाणी देण्यापासून माहिती सांगण्यापर्यंत सर्वपरीने मदत करत होता. आपल्याला मदत करणारे हे लोक आपल्या घरातील कुणीतरी आहेत, अशी भावना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसत होती. संपूर्ण मोर्चामध्ये तरुणी, महिला आत्मविश्‍वासाने सहभागी झाल्याचे दिसून आले.

मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या

अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीला चालना द्यावी

शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे

इबीसी सवलतीची मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत करावी

आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची तातडीची मदत द्यावी

शेतकऱ्यांच्या मुलाला उच्च शिक्षण मोफत मिळावे

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव निधीची तरतूद करावी

शेतीमालाला हमी भाव द्यावा

क्षणचित्रे 

काळे टी-शर्ट, ड्रेस, रिबन बांधून निषेध

लाखोंच्या संख्येने मुली, महिला सहभागी

तरुण, विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय

मोर्चात पोशाख घालून वकिलांचा सहभाग

शाळा व महाविद्यालयांना अघोषित सुटी

शासकीय कार्यालयांत शुकशुकाट

खासगी दवाखाने व वैद्यकीय सेवा ठप्प

मोर्चेकऱ्यांत अभूतपूर्व उत्साह

मोर्चाच्या रस्त्यावर पाणीवाटप केंद्र

पाच हजार स्वयंसेवक कार्यरत

लक्षवेधी फलक

मराठ्यांची उत्क्रांती - मराठा क्रांती

एकच मिशन - मराठा आरक्षण

ना ह्यांच्यासाठी ना त्यांच्यासाठी, मी येणार मराठा समाजासाठी

आजवर लढलो मातीसाठी, एक लढा जातीसाठी

शेतीला हमी भाव मिळालाच पाहिजे

मूक मोर्चाचे आदर्श उदाहरण

सांगलीच्‍या मूक मोर्चाने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोणतीही घोषणाबाजी, टाळ्या, हुल्लडबाजी दिसून आली नाही. लोकांना त्रास होईल असे कोणतेच कृत्य मोर्चात पाहावयास मिळाले नाही. सर्वजण शांततेतच मोर्चामध्ये सहभागी होत होते. मात्र लोकांच्या चेहऱ्यावर मूक आक्रोश, व्यवस्थेविरुद्धची चीड आणि उद्रेक स्पष्ट दिसत होता.