मराठा क्रांतीचे फेसबुकवर वादळ

संदीप खांडेकर
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - फेसबुकवर मराठा क्रांतीचे वादळ असे काही घोंगावतेय, की केवळ मराठा क्रांती नावाने सर्च केल्यास धडाधड शेकडो पेज दिसू लागतात. मराठा क्रांतीचे जिल्हानिहाय पेज तर आहेतच; शिवाय मराठा शिलेदारांचे वैयक्‍तिक पेज मराठा क्रांतीच्या लोगोने सजले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात दररोज मेसेज शेअर करून जनजागृतीचा धडाका सुरू आहे. 

कोल्हापूर - फेसबुकवर मराठा क्रांतीचे वादळ असे काही घोंगावतेय, की केवळ मराठा क्रांती नावाने सर्च केल्यास धडाधड शेकडो पेज दिसू लागतात. मराठा क्रांतीचे जिल्हानिहाय पेज तर आहेतच; शिवाय मराठा शिलेदारांचे वैयक्‍तिक पेज मराठा क्रांतीच्या लोगोने सजले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात दररोज मेसेज शेअर करून जनजागृतीचा धडाका सुरू आहे. 
 कोपर्डी घटनेचा निषेध व मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाज शिस्तबद्धतेने रस्त्यावर उतरत आहे. हा मोर्चा असाच शिस्तबद्धतेने सर्वत्र व्हावा, यासाठी मराठा तरुण जागता पहारा ठेवून आहेत. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘वाघासारखं चालायचं’ असा संदेश देत तरुणांनी फेसबुकवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यांचे वैयक्‍तिक पेज आहेत, असे तरुण दररोज जिल्हानिहाय बातम्यांची कात्रणे, व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करत आहेत. 

समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अन्य समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, याची खबरदारी घेऊन मेसेज तयार करून ते शेअर करत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगोला, अकलूज, बार्शी, बारामती, नगर, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्हानिहाय ग्रुप क्रिएट झाले आहेत. त्या त्या जिल्ह्यातील मोर्चा, त्यांचे मार्ग, छायाचित्रे त्यावर प्रसिद्ध केली जात असून, ज्या जिल्ह्यात मोर्चे आहेत, त्यांच्या नियोजनाची माहितीही पेजवर शेअर केली जात आहे. विशेष म्हणजे काही मराठा क्रांती पेजवर हजारो फॉलोअर्स आहेत. परदेशात शिक्षणानिमित्त स्थायिक झालेले तरुण या पेजला लाइक्‍स करत आहेत. ज्या तरुणांचे फेसबुक अकाउंट नव्हते, त्यांनी ते क्रिएट करून त्यावर मेसेज शेअर करणे सुरू केले आहे. मराठा मोर्चाविरुद्धचे षड्‌यंत्र हाणून पाडण्याचा निर्धार करत तरुणांची फेसबुकवर त्सुनामीच आली आहे. 

तरुण सरसावले
होय, मी मराठावादी आहे, मराठ्यांचा नाद करायचा नाय, मराठा आरक्षण, आता लढा मराठा आरक्षणाचा, स्वाभिमान, बापजादे लढले मातीसाठी आपण लढू एकदा जातीसाठी, असे लोगो फेसबुक पेजवर तयार करून तरुण समाजाच्या एकत्रीकरणासाठी सरसावले आहेत. 
 

पेजचे साडेचार हजार फॉलोअर्स
 येत्या १५ ऑक्‍टोबरला कोल्हापुरात मराठा क्रांती मूक महामोर्चा निघणार आहे. त्याची माहिती मराठा ‘क्रांती मोर्चा कोल्हापूर’ या पेजवर देण्यात येत आहे. पेजचे साडेचार हजार फॉलोअर्स झाले आहेत, अशी माहिती शिरीष जाधव यांनी दिली.

Web Title: maratha kranti morcha storm on facebook