गुळ उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

हेमंत पवार 
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कऱ्हाड - दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यांकडून गुळाची मागणी घटल्याने त्याचा येथील गुळाच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरात गुळाचे दर मोठ्या प्रमाणात गडगडल्याने वर्षभर घाम गाळून ऊस पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पादन खर्च आणि गुऱ्हाळ खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे. 

कऱ्हाड - दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यांकडून गुळाची मागणी घटल्याने त्याचा येथील गुळाच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरात गुळाचे दर मोठ्या प्रमाणात गडगडल्याने वर्षभर घाम गाळून ऊस पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पादन खर्च आणि गुऱ्हाळ खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे. 

सातारा जिल्ह्यातील गुळाला राज्यासह परराज्यातून मोठी मागणी असते. जिल्ह्यात गुऱ्हाळघरांचीही संख्या मोठी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होत होते. मात्र अलिकडच्या काळात मजुरांची समस्या, आर्थिक अडचणींमुळे गुऱ्हाळघरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सध्या असलेल्या गुऱ्हाळघरांत तयार होणाऱ्या गुळाला दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातून चांगली मागणी होत होती. त्यामुळे दरवर्षी गुळाचे दरही चढे राहत होते. मागील वर्षी सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये गुळाला क्विंटलला दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. यंदा मात्र त्याऊलट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर दिवसरात्र कष्टं घेवून पिकवलेल्या ऊसाचे गुऱ्हाळ केल्यानंतर त्यातून तयार होणाऱ्या गुळाला चांगला दर मिळत नसल्याने गुळ उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. चार पैसे जादा मिळतील या आशेने गुऱ्हाळ केलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर गडगडलेल्या दरामुळे पाणी फेरले गेले आहे. सध्या २ हजार ५०० ते तीन हजार रुपये गुळाला दर मिळत आहे. 

वाढलेला उत्पादन खर्च आणि गुऱ्हाळ आणि वाहतुक खर्च याचा विचार करता सध्या गुळाला साडेतीन हजार रुपयांच्यावर दर हवा आहे. मात्र गेल्या महिन्यापासून दिल्ली, गुजरात, राजस्थान उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यांकडून गुळाची मागणी घटली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे असलेल्या गुळाचा उठावत होत नाही. परिणामी गुळ साठून राहत असल्याने गुळाचे दर गडगडु लागले आहेत. त्याचा परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होवुन शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. 

गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या आशेने आपल्या ऊसाचे गुऱ्हाळ केले त्यांच्या पदरी दराच्या बाबतीत निराशाच आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा विचार करुन यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने याची दखल घेण्याच गरज निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बाजार समिती कऱ्हाड येथील सचिव बी. डी. निबांळकर यांनी 'शेतकऱ्यांनी तयार केलेल्या गुळाला गुजरात, राजस्थानसह अन्य राज्यातून होणारी मागणी घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सौद्यातून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या गुळाला मागणी कमी होत असल्याने राज्यात गुळाचे दर घसरले आहेत. सध्या २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांवर दर आले आहेत.' अशी माहिती दिली.  

 

Web Title: marathi news farmers jaggery produce economical crisis