घनकचरा बनलाय धनकचरा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

निरूपयोगी कचरा म्हणून ज्याकडे पाहत होतो, त्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खतनिर्मिती तसेच कचऱ्यातील प्लॅस्टिक विक्रीतून पालिकेच्या तिजोरीत भर पडू लागली आहे. त्यामुळे घनकचरा आता धन देणारा कचरा बनू लागला आहे.  
- यशवंत डांगे,  मुख्याधिकारी, कऱ्हाड नगरपालिका

कऱ्हाड - स्वच्छ सर्वेक्षणामुळे शहरांच्या कचऱ्यांचे डोंगर नाहिसे होत असताना कचऱ्याला किंमत मिळवून देण्याचे काम केले. त्यानुसार कऱ्हाड शहरात सध्या दररोज गोळा होणाऱ्या १५ टन ओल्या कचऱ्यावरही प्रक्रिया होऊ लागली आहे. कंपोस्ट खतासह वीजनिर्मितीसाठी कचऱ्याचा होऊ लागलेला वापर व सुक्‍या  कचऱ्यातील प्लॅस्टिकच्या विक्रीमुळे घनकचरा हा धनकचरा होताना सत्यात उतरले आहे. 

शहरात दररोज सुमारे ४० टन कचरा गोळा होतो. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न निकाली निघत आहे. शहरात दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यापैकी १५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ लागली आहे. त्यात दहा टन कचरा कंपोस्ट खतनिर्मितीला, तर पाच टन वीजनिर्मितीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्याची पालिकेपुढे डोकेदुखी राहिलेली नाही. सुक्‍या कचऱ्यातही भंगारयोग्य काच, प्लॅस्टिक, लोखंडाच्या वस्तू गोळा करून नेण्याचे काम कचरा वेचक महिलांकडून होते. कचऱ्यातील प्लॅस्टिक  पिशव्या वेगळ्या करून त्या कंपनीस पाच रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत. त्यामुळे त्याचीही विल्हेवाट लागली जात आहे.  

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करताना कंपोस्ट खतनिर्मितीसाठी पालिकेने शहरातील स्मशानभूमी, पंपिंग स्टेशन क्रमांक दोन, कार्वे नाका व हद्दवाढ भागात बायोगॅस प्रकल्पानजीक सुमारे ३४ कंपोस्ट पीठ तयार केली आहेत. कृष्णाबाई घाटावर बागेतील गोळा होणाऱ्या पाला-पाचोळ्याचा कचऱ्याच्या कंपोस्ट खतासाठी तथेच कंपोस्ट पीठ तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय पाच हजार चौरस फूट खुल्या जागेत ओला कचरा पसरून तेथे विंड्रो कंपोस्टिंगचाही प्रयोग केला जात आहे. या खताचीही विक्री पालिकेने सुरू केली असून पाच रुपये किलो दर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय पाच टन क्षमतेचा बायोगॅसपासून वीजनिर्मिती प्रकल्पही कार्यान्वित आहे. त्यातून कऱ्हाड शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला असून कंपोस्ट खत, कचऱ्यातील प्लॅस्टिक विक्रीतून पालिकेच्या तिजोरीत भर पडून घनकचरा आता धनकचरा होऊ लागल्याचे सत्यात येत आहे. त्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वच्छतादूतांच्या प्रयत्नांना नागरिकांचे मिळत असलेल्या सहकार्यामुळेच हे शक्‍य झाले आहे. 

Web Title: marathi news karad nagarpalika Solid waste