"कोंबिंग ऑपरेशन'ने बिबट्याचा शोध 

"कोंबिंग ऑपरेशन'ने बिबट्याचा शोध 

सातारा - शाहूपुरीतील खटावकर कॉलनी परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाने अद्यापि भीती कायम आहे. काल (ता. 20) रात्री बिबट्याने बघ्यांवर केलेल्या हल्ल्यात गौरव मानेसह तिघे जखमी झाले. बिबट्याला वस्तीतून सुरक्षितपणे डोंगराकडे जाता यावे, यासाठी पोलिस व वन विभागाने संयुक्तपणे "कोंबिंग ऑपरेशन' केले. त्याचबरोबर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळाही लावण्यात आला आहे. 

गौरव शंकर माने (वय 17) या युवकावर काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास नीलेश वळीवडेकर (वय 27) व वसंतराव ढगाले (वय 65) यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. वळीवडेकर यांच्या हनवटी व छातीवर नख्या लागल्या आहेत, तर ढगालेंच्या पाठीवर बिबट्याचा दात रोवला आहे. दोन्ही जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

काल सायंकाळी सहा-साडेसहादरम्यान बिबट्याने खटावकर कॉलनी व आंबेदरे रस्त्याच्या परिसरात दर्शन दिले. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांचा जमाव मागे लागला. गर्दीमुळे बिथरलेल्या बिबट्याने आंबेदरे रस्त्याच्या बाजूचा ओघळ व परिसरातील झुडपांचा आसरा घेतला. त्या वेळी गौरवच्या मांडीवर नखे लागल्याने तो जखमी झाला. ही बातमी शाहूपुरीसह संपूर्ण सातारा शहरात पसरली. काही वेळांतच बघ्यांची आंबेदरे रस्त्यावर गर्दी झाली. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास पोलिस व वन विभागाने "कोंबिंग ऑपरेशन' केले. फटाके वाजवत व ब्याटऱ्यांचा झोत मारत या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पळून जाण्याच्या वाटेपर्यंत हाकलले. त्यामार्गे डोंगराकडे निसटलेला बिबट्या वाटेत बघ्यांच्या गर्दीला पाहून बिथरला व मूळ जागेकडे परत फिरला. येताना दहा-साडेदहा वाजण्याच्या दरम्यान बघ्यांच्या गर्दीतील नीलेश व वसंतराव यांच्यावर हल्ला झाला. वळीवडेकर यांना गंभीर दुखापत झाली आहे. 

शाहूपुरी पोलिस, वन विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी जागता पहारा आहे. आज दिवसभरात बिबट्याने कोणालाही दर्शन दिले नाही. बिबट्याला शोधण्यासाठी आज सकाळी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली. सुमारे 100 मीटर अंतरात 20 मिनिटे ड्रोन कॅमेऱ्याने ओढा व झुडपांचा प्रदेश पिंजून काढला. मात्र, कोठेही बिबट्याचे दर्शन झाले नाही. पहाटेच्या वेळी बिबट्या ओघळीतून पसार झाला असावा, असा कयास आहे. मात्र, वन विभागाकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. अभिनव माध्यमिक विद्यालय याच भागात असल्याने आज शाळेचा सुट्टी देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने जाहीर केला. 

बिबट्या दिसल्यास तत्काळ वन विभागास कळवा. लहान मुलांना घराबाहेर सोडू नका. बसलेल्या स्थितीत राहू नका. कोणतीही माहिती मिळाल्यास 1926 या हेल्पलाईनवर संपर्क साधा. 
- अनिल अंजनकर, उप वनसंरक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com