अस्वलांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

अस्वलांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

पाटण : वनकुसवडे पठारावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोन क्षेत्रात असणाऱ्या मरड या गावातील हणमंत दगडू मिसाळ यांच्यावर तीन अस्वलांनी हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. शुक्रवारी रात्री भिकाडी गावाजवळ ही घटना घडली असून, गावाजवळ हा प्रकार घडल्याने मिसाळ यांनी आरडाओरडा केल्यावर गावकरी मदतीला धावल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मरड येथील मिसाळ हे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पाटणहून मरडला निघाले होते. काठीटेक येथे ते एसटी थांब्यावर उतरुन गावी चालत जात असताना ते भिकाडी गावच्या जवळ गेले. त्या ठिकाणी झुडपात दडलेल्या तीन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या एका पायाचा लचकाही अस्वलांनी काढला आहे. तर शरीरावर अन्य ठिकाणीही जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर हल्ला सुरु असताना त्यांनी जोरजार आरडाओरडा केला. त्यामुळे भिकाडी गावातील काही लोक त्यांच्या मदतीसाठी धावले. रक्तबंबाळ असलेल्या मिसाळ यांना ग्रामस्थांनी अस्वलांच्या तावडीतून सोडवून अस्वलांना हुसकावून लावले. दरम्यान, जखमी मिसाळ यांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तेथेही उपचार होत नसल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकाराने भिकाडी व मरड गावासह वनकुसवडे पठारावरील गावात भीतीचे वातावरण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com