मतदान ओळखपत्र आता नव्या "लूक'मध्ये ! 

मतदान ओळखपत्र आता नव्या "लूक'मध्ये ! 

गडहिंग्लज : फोटो काळा व अस्पष्ट आहे, नावच दिसत नाही, नाव, गाव, पत्त्यामध्ये चुका आहेत. अशा स्वरूपाची मतदान ओळखपत्राबाबत मतदारांची असलेली ओरड आता बंद होणार आहे. ब्लॅक ऍण्ड व्हाईट ऐवजी आता रंगीत, चकचकीत आणि टिकाऊ (पीव्हीसी) ओळखपत्र नवमतदारांच्या हाती पडले आहे. ओळखपत्राचा हा नवा "कार्पोरेट लूक' पाहून मतदारांतही त्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. 

मतदान ओळखपत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उपक्रम राबवण्यासह मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठीही निवडणूक आयोग विविध उपाययोजना करीत आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचाही भाग महत्त्वाचा आहे. पूर्वी ही ओळखपत्रे ब्लॅक ऍण्ड व्हाईट होती. त्यावर बहुतांश मतदारांचा फोटो काळाकुट्ट व अस्पष्टच असायचा. ओळखपत्रावरील इतर मजकुरातही विशेष करून नाव, गाव, पत्ता यामध्ये चुका असायच्या. त्याच्या दुरुस्तीसाठी मतदारांना धावपळ करावी लागते. पूर्वीची ही ओळखपत्रे जिल्ह्याच्या ठिकाणी तयार व्हायची. नोंदणी झालेल्या नवीन मतदारांसह चुकीच्या दुरुस्तीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून ते सर्व जिल्ह्याला पाठवायला लागायचे. तेथून ओळखपत्रे तयार होऊन मतदारांच्या हातात पडत असत. दरम्यान, जुन्या मतदान ओळखपत्रासंदर्भात मतदारांच्या तक्रारी वाढतच होत्या. 

या सर्वावर पर्याय म्हणून निवडणूक आयोगाने आता प्रयोगिक तत्त्वावर "पीव्हीसी' व्होटिंग कार्ड आणले आहे. नवीन मतदारांचे ओळखपत्र पहिल्यांदाच जिल्ह्यातील मतदारांच्या हाती पडले आहे. पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससारखीच ही ओळखपत्रे टिकाऊ आहेत. पूर्वीच्या ओळखपत्रात जन्माचे केवळ वर्ष असायचे. आता या ओळखपत्रावर संपूर्ण जन्मतारखेची नोंद असणार आहे. ही ओळखपत्रे थेट मुंबईहून येत आहेत. प्रायोगिक तत्त्वावरील ही ओळखपत्रे असल्याने त्यासाठी अजून एजन्सी निश्‍चित केलेली नाही. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच मतदारांच्या हाती नव्या "लूक'ची ओळखपत्रे पडणार आहेत. 

मतदारांची धावाधाव 
कार्पोरेट लूकची नवी ओळखपत्रे नव्या मतदारांच्या हाती पडल्यानंतर इतर मतदारही असे ओळखपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे धाव घेत आहेत. परंतु पहिल्या टप्प्यात केवळ नवमतदारांनाच ही ओळखपत्रे येत असल्याचे सांगण्यात आल्याने अजून ब्लॅक ऍण्ड व्हाईट ओळखपत्रावरच इतरांना समाधान मानावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com