जीएसटी, नोटाबंदी हे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्लेच : पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

कर्‍हाड : नोटाबंदी पाठोपाठ लागू केलेला जीेएसटी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्लेच आहेत. योजना लागू करताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्याचे गणितही सरकारला जमले नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कर्‍हाड : नोटाबंदी पाठोपाठ लागू केलेला जीेएसटी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्लेच आहेत. योजना लागू करताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्याचे गणितही सरकारला जमले नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

विद्यार्थी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व मित्र परिवारातर्फे दिवाळीनिमित्त आयोजित फराळ व लोकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. माजी उपनगराध्यक्ष हाजी बाबासाहेब पटेल, बाळासाहेब मोहिरे, कातीलाल भंडारी, बांधकाम सभापती बाळासाहेब यादव, नगरसेवक किरण पाटील, मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मनसचे शहराध्यक्ष सागर बर्गे, संभाजी बिग्रेडचे शहाराध्यक्ष भूषण पाटील, युवा नेते प्रमोद पाटील, नितीन ओसवाल उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले,  ''शासनाने लागू केलेला जीेएसटी, त्यापूर्वीची नोटाबंदी अनेक अर्थाने सध्या वादाची ठरत आहे. दोन्ही निर्णयांच्या अंमलबजावणीत मोठी गडबड आहे. केवळ त्याचे नियोजन झालेले नाही. शासनाने त्याचा विचारच केलला नाही. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शासनाने व्यापाऱ्यांना त्रास व्हावा म्हणून निर्णय घेतला आहे. असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी लागणारी यंत्रणा उभी न करता निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो निर्णय अर्थव्यवस्थेलाच मारक ठरला आहे. त्याही पुढचा निर्णय जुलै २०१८ पर्यंत राखीव ठेवला आहे. तो इव्हीएमचा निर्णय कधीतरी घ्यावा लागणार आहे. मात्र त्यामुळे बाजारपेठेतील सारा व्यवहार ठप्प होईल, अशी शासनाला भीती आहे. त्यामुळे त्याबाबतचेही नियोजन न करता निर्णय घेतल्यास आणखी अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. 

नोटाबंदी म्हणजे अर्थव्यवस्थेवरील पहिला हल्ला होता, असे सांगून चव्हाण म्हणाले, काळा पैसा म्हणून फक्त रोख रक्कम अशी चुकीची कल्पना डोक्यात ठेवून सध्याचे शासन काम करत आहे. रोख रक्कम हा काळा पैसा होऊ शकत नाही. ती तजवीज असते. याचाही विचार व्हायला हवा. तो विचार करताना शासन काळ्या संपत्तीकडे दुर्लक्ष करत आहे, हे वास्तव आहे. काळी संपत्ती ती मग गुंतवणुकीत आहे. ती रिअल इस्टेट असेल, सोन्या चांदीत असेल किंवा जमीनीत गुंतवणूक असेल. त्याकडे सरकारचे लक्षच नाही. किंबहुना त्याकडे पाहायचेच नाही, असा सरकारचा विचार असावा. मात्र त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नोटाबंदी व जीेएसटी दोन हल्ले आहेत. यातून कसे सावरता येईल याचा काॅग्रेस म्हणून देशपातळीवरील नेत्यांमध्ये त्याचा विचारविनिमय सुरू आहे. सकारात्मकतेतून त्याचा विचार केला तरच त्यातून मार्ग निघू शकतो. त्यासाठी आम्ही लोकांशी, व्यापाऱ्यांशी व सर्वच स्तरातील लोकांशी बोलतो आहोत  त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. त्याशिवाय योग्य मार्ग निघणे कठीण आहे. 

यावेळी राजेंद्र यादव, कांतीलाल भंडारी, दादा शिंगण, बाळासाहेब मोहिरे, प्रमोद पाटील यांची भाषणे झाली. यावेळी विविध संघटनांतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार झाला. इरफान सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. शिवराज मोरे यांनी आभार मानले.