उत्पादक, ग्राहक गौरवशाली परंपरेत उपेक्षितच 

representational image
representational image

कोल्हापूर : 'गोकुळ'च्या दीड-दोनशे कोटींच्या ठेवी आहेत. 14 राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सलग तीन वेळा सहकार भूषण पुरस्कार, शेतकऱ्यांना दरात सुविधा मिळते. 2020 ला प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलन करणार म्हणून ज्या 'गोकुळ'ची ही गौरवशाली परंपरा सांगितली जाते, त्याच 'गोकुळ'मध्ये 'राजकारण' होतंय म्हणून दूध दरवाढीपासून पळ काढला जात आहे. गोकुळ सक्षम आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र, दूध उत्पादक आणि ग्राहक या गौरवशाली परंपरेचे कायम उपेक्षितच राहिले आहे. 

गोकुळच्या प्रत्येक सभेत संघाची ही गौरवशाली परंपरा सांगून टाळ्या घेतल्या जातात. दूध उत्पादकांचे मात्र कंबरडे मोडले जात आहे. जे राजकारण करतात, त्यांना राजकारणातूनच उत्तरे दिली जातात. तो ज्याचा-त्याचा प्रश्‍न आहे. दूध उत्पादकच संघाचे मालक म्हणायचे आणि त्यांना दूध दर न देता, केवळ संघाचे वैभव सांगायचे, याने उत्पादकांचे पोट भरणार नाही. दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून होणारे मोर्चे-प्रतिमोर्चे निघत आहेत. याचा कोण काहीही अर्थ लावू शकतो. यातील राजकारण बाजूला ठेवले तर मात्र गोकुळ संघासाठी दूध उत्पादक की उत्पादकांसाठी संघ असा प्रश्‍न पडतो. 

उत्पादकांची लूट आणि ग्राहकांना फटका : 
दुधाचे उत्पन्न वाढल्यामुळे दूध खरेदी दर कमी केले. मग याचा फायदा ग्राहकांना का दिला जात नाही, हाही मोठा सवाल आहे. एकीकडे उत्पादकांना दुधाला कमी दर द्यायचा आणि ग्राहकाला मात्र चढ्या दरालाच विक्री करायची, हे गणित समजण्यापलीकडे आहे. 

40 कोटी नव्हे; 72 रुपये दिवसाला 
गोकुळमुळेच उत्पादकांच्या खात्यावर 10 दिवसाला 40 कोटी रुपये जमा होतात, असे सांगितले जाते. वास्तविक हे 40 कोटी रुपये जिल्ह्यातील 5 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या साडेपाच लाख शेतकऱ्यांना एवढी रक्कम वाटप केल्यास सरासरी 727 रुपये दहा दिवसाला आणि 72 रुपये दिवसाला मिळतात. देशातील असा एकही कामगार सापडणार नाही, की जो पहाटे पाच ते रात्री आठपर्यंत राबून 72 रुपये मिळतो. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर 40 कोटी म्हणून बिंबवत राहायचे आणि गोकुळची गौरवशाली परंपरा ऐकून समाधान मानायचे, या व्यतिरिक्त उत्पादकांच्या वाट्याला दुसरे काहीही मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com