सलग बारा तास नाट्यगीतांची अनुभूती

नीला नागावकर
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

एक ऑक्‍टोबरचा रविवार उजाडला तोच मुळी आगळ्या हुरहुरीने. सलग बारा तास नाट्यगीते सादर करण्याच्या ठाम निश्‍चयाने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले आणि हाता-पायांना काहीसा कंप सुटला. सर्व गायक, वादक, निवेदक स्थानापन्न झालो. समोर नाट्यसंगीतावर प्रेम करणारे आणि आमच्या प्रयत्नांना कौतुकाने दाद देण्यासाठी जमलेले दर्दी रसिक पाहून बळ आले. ‘श्री गजवदना दे मतिहिना’ सादर झाले, टाळ्यांची दाद मिळाली आणि स्वरसुरांच्या मैफलीत रंग भरू लागले. सलग बारा तासांत १२५ नाट्यपदे सादर झाली.

आमचा गायक, वादक, निवेदक असा बारा जणांचा हा ग्रुप आहे. या माध्यमातून आम्ही नाट्यगीतांप्रती आपले प्रेम जपत असतो. खूप दिवसांपासून माझ्या मनात आपल्या सहकलाकारांबरोबरच १०१ नाट्यगीते सादर करण्याचा कार्यक्रम करण्याची कल्पना रेंगाळत होती. ही कल्पना मी रविराज इव्हेंटच्या सौ. सीमा जोशी यांना सांगितली आणि त्यांना ती आवडली. त्यांनी हा कार्यक्रम ‘विश्‍वविक्रमी’ कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आम्हीही सर्वजण या कार्यक्रमाच्या तयारीला लागलो.

तांत्रिक बाबींची जबाबदारी सीमाताईंनी उचलली आणि आम्ही दिवसभर बारा तासांत १२५ नाट्यपदे कशा पद्धतीने सादर करता येतील याच्या तयारीला लागलो. हे ‘शिवधनुष्य’ पेलायचेच या कल्पनेने झपाटून कामाला लागलो. गायक, वादक मंडळी एकत्र येऊन सराव सुरू केला.

आमच्या या कल्पनेला दाद देताना ऑर्गन वादक पंडित विश्‍वनाथ कान्हेरे (मुंबई) व लक्ष्मण पाटील (इचलकरंजी) हे साथीला आले. आम्ही सर्वजण नाट्यगीतांचा सराव करू लागलो. चार महिन्यांच्या या सरावादरम्यान आम्हाला सर्वांत मोठी साथ लाभली ती डॉ. एन. वाय. जोशी सर (तबला) व माझे मिस्टर डॉ. ज. ल. नागावकर (ऑर्गन) यांची. आम्हा गायकांच्या सोयीसाठी दोघांनीही त्यांचे व्याप सांभाळून आमच्या वेळा सांभाळल्या. ‘आवड असली की, सवड मिळते’ हे दोघांच्या कृतीतून सिद्ध झाले. तयारी करताना चर्चा होत होत्या, फाटे फुटत होते, वेगवेगळे विचार मांडले जात होते; पण प्रत्येकाचे एकच लक्ष्य असल्यामुळे सर्व प्रवाह हळूहळू एका दिशेने येऊ लागले. आमच्या प्रयत्नांमध्ये सीमा जोशी बळ भरत होत्या. या एकत्र येण्यातून आम्हा सर्वांमध्येही एक अनामिक बंध तयार झाले. एकमेकांना सांभाळून घेत आमची भक्कम तयारी होऊ लागली आणि अखेर तो क्षण उजाडला. रविवारी सर्वजण एकत्र आलो. सर्वांनी महालक्ष्मीची आराधना केली आणि कार्यक्रमास प्रारंभ झाला. मनात धाकधूक होती, सलग बारा तास आपण बसू शकू का? उपस्थित श्रोत्यांना आपली नाट्यगीते आवडतील का? आवाज लागेल का? या आणि अशा अनेक प्रश्‍नांनी फेर धरला होता; मात्र आम्ही सर्व कलाकार कार्यक्रमात रंगून गेलो. दिवसभर आम्हाला हवे-नको पाहताना रवींद्र व राहुल जोशी यांची मोठीच धावपळ झाली. सौख्य सुधा, शंभो शिवहर, अजूनी खुळा हा नाद, उजळीत जग मंगलमय आदी नाट्यपदे सादर होत कार्यक्रमाचा एक एक टप्पा पार पडत गेला आणि आमचाही आत्मविश्‍वास दुणावत गेला. अखेरचे नाट्यगीत सादर केले आणि उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर केला. त्या प्रतिसादाने आमच्या दिवसभराच्या कष्टाची पोचपावतीच मिळाली.

कार्यक्रमाच्या सांगतेवेळी बाहेरून आलेल्या चार ॲवॉर्डस्‌ चार निरीक्षकांनी कोल्हापूरबद्दल गौरवोद्‌गार काढले. आमचे कौतुक करताना आमच्या विक्रमास मंजुरी दिल्याचे जाहीर केले. हे सर्व निरीक्षक व परीक्षक राज्याबाहेरील निरनिराळ्या राज्यांतून आलेले होते. त्यांना नाट्यगीतांची मराठी भाषा बिलकूल समजत नव्हती; परंतु स्वर-तालाचा आनंद घेत ती सर्व मंडळी अखंड बारा तास बसून राहिली. त्या दिवशीच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असल्याने आम्हा सर्व ज्येष्ठांचे विशेष कौतुक करण्यात आले. सर्व रसिक श्रोत्यांच्या प्रतिसादामुळेच हा ‘विश्‍वविक्रमी’ कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे करू शकलो.

आम्ही मिळून सारे...

 • सौ. नीला नागावकर - गायिका
 • सौ. वीणा जोशी - गायिका
 • मधुसुदन शिखरे - गायक
 • प्रकाश सप्रे - गायक
 • पंडित विश्‍वनाथ कान्हेरे - ऑर्गन साथ
 • लक्ष्मण पाटील - ऑर्गन साथ
 • डॉ. ज. ल. नागावकर - ऑर्गन साथ
 • डॉ. एन. वाय. जोशी सर - तबला साथ
 • शंतनु कुलकर्णी - तबला साथ
 • मयुरेश शिखरे - तबला साथ
 • कु. मृणालिनी परुळेकर - व्हायोलियन साथ
 • सौ. सीमा जोशी - निवेदिका
Web Title: marathi news marathi websites Kolhapur News Kolhapur Cultur