उद्धव ठाकरेंमुळेच मी शिवसेना सोडली : नारायण राणे 

File photo of Narayan Rane
File photo of Narayan Rane

सांगली : 'मी शिवसेना का सोडली, याला उद्धव ठाकरेच कारणीभूत आहेत. उद्धव हे कपटी आहेत. मुलगा म्हणून उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जे दु:ख दिले, ते भविष्यात मी सगळ्यांसमोर आणेन', अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज (शनिवार) शिवसेनेवर कडाडून टीका केली. 'शिवसेना सत्तेमध्ये भागीदार आहे आणि तरीही ते सरकारवर टीका करत असतात. सत्तेत राहून सत्तेवरच टीका करायची आणि पुन्हा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसायचे, असा खेळ शिवसेना खेळत आहे', असा आरोपही राणे यांनी केला. 

नव्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर राणे यांनी कोल्हापूरनंतर सांगलीचा दौरा केला. अनेक राजकीय पक्षांतील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भेट नारायण राणे सांगलीमध्ये घेत आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेनेवर टीका करतानाच भविष्यातील वाटचालीसंदर्भातही काही सूचक वक्तव्ये केली. 

राणे म्हणाले, "शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; नाहीतर सत्तेला लाथ मारतो म्हणणाऱ्या उद्धव यांचेही तेवढेच पाप सत्तेत आहे. सत्तेशिवाय काम होत नाही. सत्तेत राहून चांगले काम करता येते. पण शिवसेनेने जनतेसाठी काहीही केले नाही. उद्धव ठाकरे यांना कशाचीच जाण नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न कसे सोडवायचे, हेदेखील त्यांना माहीत नाही. कुठे काय बोलावे हे कळत नाही. जे शक्‍य नाही, ते उद्धव बोलतात. शिवसेना आता पाच टक्केही उरलेली नाही. मी फक्त शिवसेनेलाच लक्ष्य करत नाही; कधीही कुणालाही लक्ष्य करतो.'' 

''मुख्यमंत्री करतो' असे आश्‍वासन काँग्रेसने दिले; पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. तीन-चार वेळा त्यांनी हुलकावण्याच दिल्या. असा हा काँग्रेस पक्ष राज्यात आणि देशातही दिशाहीन झाला आहे. त्यामुळेच मी काँग्रेस पक्ष सोडला', असे राणे यांनी सांगितले. 'सांगलीमधील अनेक कार्यकर्ते गाठीभेटी घेत आहेत. ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. भविष्यात आमच्या पक्षाचा चांगला जम बसेल. भाजपसोबत आमचा पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, दलित आणि अल्पसंख्यांकांना आर्थिकदृष्ट्या समपातळीवर आणण्याचे काम आम्ही करू. मला कुणी फसवेल असे वाटत नाही. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. तो ते पूर्ण करतील. भाजपमध्ये ज्योतिषी जास्त असतील, त्यामुळे गुजरात निवडणूक झाल्यावरच राणेंना पक्षात घ्या असे सांगितले असेल', असेही राणे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com