सहादरीकरणातील जुन्या पुलांना भगदाडे 

सहादरीकरणातील जुन्या पुलांना भगदाडे 

सायगाव - पुणे-बंगळूर महामार्गाचे सहादरीकरणाचे काम सुरू असताना जुन्या पुलांची कामे न केल्याने आता त्या पुलांना भगदाडे पडू लागली आहेत. पुलांच्या आतील बाजूनेदेखील पुलाचा भराव ढासळू लागला असल्याने महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. 

सहापदरीकरणाच्या कामात ठिकठिकाणी पुलांची कामे झाली. परंतु, आनेवाडी ते विरमाडे दरम्यान असणारे जुने दुपदरी पूल तसेच ठेवून त्यावरच तात्पुरती डागडुजी करून प्रवासी वर्गाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार कंपनीकडून सुरू असल्याचे दिसत आहे. या पुलांना जवळपास 70 वर्षे झालेली आहेत. या कामांत हे पूल सहापदरी करतील असे वाटले होते. मात्र, हे पूल दुपदरीच ठेवून संबंधित कंपनीने घोटाळा केल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आनेवाडी येथील पुलाचे कठडे निखळले होते तर आता विरमाडे येथील महामार्गावरील जुना दुपदरी पूल खचला आहे. 

विरमाडे येथे ओढ्यावर असलेला क्रमांक 750 हा पूल मोठ्या प्रमाणात खचल्याची कल्पना स्थानिकांनी महामार्गाचे काम करणाऱ्यांना दिली. मात्र, दिवसभर यावर कोणतीही अंमलबजावणी न करता रात्रीच्यावेळी हे काम सुरू झाले. संबंधित अधिकाऱ्यांनीच रात्रीच्या वेळी हे काम करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, असे येथील कामगारांनी सांगितले. त्याप्रमाणे केवळ तात्पुरता मुरूम व डांबराचा भराव टाकून मलमपट्टी केली. त्यावेळी महामार्गावरील वाहतूक सुरूच ठेवण्यात आली होती. मध्यंतरी "सकाळ'ने या मार्गावरील असणाऱ्या दुपदरी पुलांबाबतीत आवाज उठवला होता. त्यावर तातडीने अधिकाऱ्यांनी कार्यवाही करत तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीचे काम काहीच न करता फक्त येथे फलक लावण्याचे  काम मात्र लवकर केले. 

कंपनीचे वेळकाढू धोरण व हलगर्जीपणामुळे हजारो लोकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून, वेळीच उपाययोजना न झाल्यास अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सातारा, भुईंज, पाचवड पाठोपाठ आता विरमाडे येथील पुलाचा भाग खचू लागल्याने महामार्गाच्या कामावर शंका उपस्थित होत आहे. 

""खचलेल्या पुलांची दिवसा कामे केली तर स्थानिक ग्रामस्थ त्यावर प्रश्‍न उपस्थित करतात. त्यामुळे हे अधिकारी रात्रीच्या वेळी कामे करून जाणीवपूर्वक प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत.'' 
- सचिन सोनावणे,  अध्यक्ष, विकास सेवा सोसायटी, विरमाडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com