विद्यार्थ्यांतील ‘नटसम्राट’ अवतरला!

एकांकिका सुरू होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या परिसरात बालगोपाळांमध्ये असा ‘माहोल’ पाहायला मिळत होता.
एकांकिका सुरू होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या परिसरात बालगोपाळांमध्ये असा ‘माहोल’ पाहायला मिळत होता.

सातारा - कोण राजा झाला होता तर कोण प्रधान, कोण यम झाला होता तर कोण पोलिस, आजीबाई, वारकरी, टीचर... ही सर्व पात्रे मेकअपनंतर आपापल्या भूमिकेला घट्ट धरून बसली होती. कोणाला आधीच ‘बेअरिंग’ गवसले होते, तर कोण ‘बेअरिंग’साठी धडपडत होता. ही सर्व घालमेल चालली होती अर्थातच मनातल्या मनात. निमित्त होते ‘सकाळ एनआयई नाट्यस्पर्धा २०१८’चे ! 

शाहू कलामंदिराचा मखमली पडदा आज सकाळी बाजूला सरकला आणि लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेला रंगमंच समोर आला. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’च्या वतीने आयोजित ‘सकाळ एनआयई नाट्यस्पर्धा २०१८’ या स्पर्धेस आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्री कैलास फूड इंडस्ट्रीज (अमृतवाडी) हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत, तर जंगलहुड, पेस आयआयटी ॲण्ड मेडिकल सातारा, कणसे होंडा- ह्युंदाई हे सहप्रायोजक आहेत. 

शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, ‘लागिरं’ फेम रवींद्र डांगे, ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे, रंगकर्मी वनराज कुमकर, कैलास फूड्‌सचे दत्ताशेठ बांदल, पेस आयआयटी मेडिकलचे डॉ. अभय टोणपे, कणसे ह्युंदाईचे अरुणराव कणसे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर आदी उपस्थित होते. 

या वर्षी साताऱ्यात प्रथमच शालेय स्तरावर एकांकिका स्पर्धा होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. स्पर्धेत शहर व परिसरातील १७ शाळा सहभागी झाल्या आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून शाळांचे संघ नाट्यगृहावर येण्यास सुरवात झाली. बालकलावंत तसेच त्यांचे रंग-वेषभूषाकार झालेल्या शिक्षकांनी अल्पावधीतच ग्रीनरुमस्‌चा ताबा घेतला.

‘प्रधान’, ‘राजा’, ‘वारकरी’, ‘आजीबाई’, ‘टीचर’ यांचे ‘बेअरिंग’ घेऊन काही पात्रं वावरताना दिसली. काही पात्रं वेशभूषा सावरत आपली एकांकिका यानंतर कितवी, याचा ताळमेळ घालत होती. तिसऱ्या घंटेची वाट पाहात रंगपटात थांबलेल्या काही चेहऱ्यांवर ताण जाणवत होता; पण तो रंगमंचावर प्रेक्षागृहाला सामोरे जाण्याचा नव्हे तर आपला ‘मेकअप’ पुसला जाईल की काय, याचा होता! अशा गमती-जमतीत स्पर्धेला सुरवात झाली. पहिल्या दिवशी आज आठ व उद्या (ता. १५) नऊ एकांकिका सादर होणार आहेत. 

शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच शिक्षणाचा हेतू असतो. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने ‘सकाळ एनआयई एकांकिका’ स्पर्धेचे हे व्यासपीठ मोलाचे ठरेल, असा विश्‍वास श्रीमती गुरव यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांना साताऱ्यात एक चांगली संधी निर्माण करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन रवींद्र डांगे यांनी केले. ‘साताऱ्याच्या रंगभूमीला थोर परंपरा लाभली आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी शालेय एकांकिका स्पर्धेसारखे उपक्रम उपयुक्त ठरतील’, असा विश्‍वास श्रीकांत कात्रे यांनी व्यक्त केला. प्रायोजकांच्या वतीने अभय टोणपे यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश निंबाळकर यांनी आभार मानले.

आज एकांकिका सादर करणाऱ्या शाळा
साधना इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी, लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, साखरवाडी माध्यमिक विद्यालय साखरवाडी (ता. फलटण), दिशा ॲकॅडमी वाई, अजिंक्‍यतारा प्राथमिक विद्यालय शेंद्रे (सातारा), निर्मला कॉन्व्हेंट सातारा, लोकमंगल हायस्कूल कोडोली (सातारा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com