‘ओपन’ मटक्‍याचा ‘क्‍लोज’ कधी? 

‘ओपन’ मटक्‍याचा ‘क्‍लोज’ कधी? 

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात जोमाने खुलेआम मटका सुरू आहे. नव्या पोलिस अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली की मटका, जुगार अड्ड्यांचा बीमोड करू, अशा घोषणा केल्या जातात. साहेबांपुढे इंप्रेशन मारण्यासाठी यंत्रणाही खडबडून कामाला लागते. दोन-चार ठिकाणी दणक्‍यात कारवाई केली जाते. मटकाबुकी, मालकही अड्डे बंद ठेवतात. जणू काही सर्व आलबेल असल्याचे वातावरण तयार होते. पुन्हा नव्या अधिकाऱ्याचा अंदाज आला की ‘येरे माझ्या मागल्या’ची परिस्थिती निर्माण होते. हा इतिहास जिल्हावासीयांना नवीन नाही. 

सध्या शहरासह जिल्ह्यात डब्बल चिठ्ठी, ऑनलाईन, ‘पी’ भाव (पानावर भाव), मोबाईल अशा वेगवेगळ्या पद्धतीने मटका सुरू आहे. मटक्‍याचा बाजारभाव १ रुपयाला १६५ आणि ३३० रुपये इतका आहे. मटक्‍याच्या विळख्यात सापडलेल्यांच्या तोंडातून विजय, अनिल, बबन, सलीम, आयूब, कुमार, प्रवीण, मधुकर, नाना, सम्राट अशी नावे कायम ऐकण्यास मिळतात.  मटका चालविण्याचे काम थेट मालक तर काही ठिकाणी एजंटाचा वापर केला जातो. काही ठिकाणी फिरत्या स्वरूपात मटका घेतला जातो. मटका कशा पद्धतीने आणि कोठे घ्यायचा, त्याचे कलेक्‍शन कोठे जमा करायचे ते मालकापर्यंत कसे पोचवायचे, तेथून गिऱ्हाईकाचे पेमेंट कसे भागवायचे, याची स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, या यंत्रणेकडे सहसा कोणी लक्ष देतच नाही. दिले तरी ते तात्पुरत्या स्वरूपाचे असते. त्यानंतर सोईस्कररीत्या दुर्लक्ष करण्याची परंपराच बनली आहे.

किती अधिकारी आले, किती गेले; मात्र जिल्ह्यातील मटका सुरूच राहिला. नवा अधिकारी आला, की कारवाईचा फार्स करायचा. चार दिवस उलटले की पुन्हा अड्डे सुरूच. मटका कोठे कसा सुरू आहे, त्याचे बुकी, मालक कोण याची माहिती सर्वांनाच असते; मात्र सामान्य भीतीने तर काहीजण जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करतात. या मटक्‍यात गुरफटलेली अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतात, हे जळजळीत सत्य जिल्ह्याला नवीन नाही. हे थांबवणार कसे हाच खरा प्रश्‍न आहे. मटक्‍याचा विळखा पडतोय कसा, हे मांडणारी मालिका आजपासून...

या परिसरात होतेय कलेक्‍शन
 जुना राजवाडा - हुतात्मा गार्डन ते गोखले कॉलेज चौक परिसर, शिवाजी पेठ, क्रशर चौक, न्यू महाद्वार रोड
 शाहूपुरी - व्हीनस कॉर्नर, लाईन बाजार, कसबा बावडा, सीबीएस स्थानक
 लक्ष्मीपुरी - गंगावेश, सीपीआर चौक
 राजारामपुरी - शाहूमिल परिसर, यादवनगर, विक्रमनगर, जवाहरनगर चौक
 करवीर - खानसरी, शिंगणापूर, आंबेवाडी, बालिंगा, चिखली, निगवे खालसा, केर्ले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com