गणेशोत्सवातही सुन्न मेढा, मोहाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

हुतात्मा रवींद्र धनावडेंना उत्स्फूर्त बंदद्वारे श्रद्धांजली; मनामनात गहीवर

मेढा - जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेले मोहाट (ता. जावळी) येथील सुपुत्र रवींद्र धनावडे यांना श्रद्धांजली आणि त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जावळीचे मुख्यालय असलेल्या मेढा आणि परिसरातील मोहाट गावासह सर्वत्र आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अगदी अत्यावश्‍यक सेवांसह सर्व घटकांतून उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. त्यामुळे ऐन गणशोत्सवात मेढ्यात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता, तद्वत सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

मेढ्याच्या चौकाचौकांत ‘हुतात्मा जवान रवींद्र धनावडे अमर रहे’ चे फलक लावण्यात आले होते. विविध मंडळे, मित्र व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा धनावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावले होते. तालुक्‍यातून आपल्या हुतात्मा सुपुत्राच्या दर्शनासाठी मिळेल त्या वाहनाने लोक मोठ्या संख्येने सकाळपासून मेढ्यात व मोहाटमध्ये जमू लागले होते. मेढ्यासह मोहाटपर्यंत ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आलेला होता. सर्वत्र शांततापूर्ण असे सुन्न वातावरण होते. या आकस्मित घडलेल्या घटनेमुळे मेढा व मामुर्डीमध्ये असणारे नियोजित कार्यक्रम संयोजकांनी रद्द केले होते. 

मोहाटमध्ये हुतात्मा जवान धनावडे यांच्या घरी नकळत माहिती कळल्याने सारेच नातेवाईक गहीवरून गेले होते. जो तो सुन्न झाल्याचे वातावरण प्रत्येकाचे हृदय हेलावणारे ठरले होते. रवींद्रच्या आठवणी त्यांचे कुटुंबिय व मित्रमंडळी काढत होते. सर्वांशीच आदराने व चांगुलपणाने वागणारा रवींद्र आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मेढ्यापासून ते जन्मगाव असलेल्या मोहाटपर्यंत पार्थिवाची मिरवणूक काढण्यासाठी ट्रॅक्‍टर-ट्रॉलीची केलेली सजावट आणि ठिकठिकाणी लावलेले श्रद्धांजली फलक पाहून रवींद्रचे जवळचे नातेवाईक मेढ्यातच आक्रोश करत असताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्यानंतर त्यांना ग्रामस्थांनी मोहाट येथे नेले. तेथे हळहळू गर्दी वाढत होती. पार्थिव कधी येणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. 

माझा दादा चांगला येऊ दे...
रवींद्रच्या घरात गणपती बसलेले असल्याने गणेशाला हात जोडून ‘माझा दादा चांगला येऊ दे’ ही आईची हाक प्रत्येकाच्या काळजाला चिरत होती. सारे वातावरण हृदयद्रावक झाले होते.