राजकारणात गरम... विकासकामांत नरम!

मेढा - मुख्य बाजारपेठेत तहसील कार्यालयालगतच पडलेला कचऱ्याचा ढीग.
मेढा - मुख्य बाजारपेठेत तहसील कार्यालयालगतच पडलेला कचऱ्याचा ढीग.

मेढा नगरपंचायत अडचणींच्या फेऱ्यात; मूलभूत सुविधांसाठीच नागरिकांची पंचाईत

मेढा - राज्यातील सर्वात लहान म्हणून प्रसिद्ध असलेली मेढा नगरपंचायत एकाच नव्हे तर अनेक अडचणीत सापडली आहे. राजकारणात गरमागरम असणारी ही नगरपंचायत विकासकामांत मात्र थंडच दिसतेय. तालुक्‍याचे ठिकाण असतानाही मेढ्यात एकही सुलभ स्वच्छतागृह नाही. गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. दरमहा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतोच. मूलभूत सुविधांसाठीच नागरिकांची पंचाईत होताना दिसते.

स्वच्छतागृहाची गैरसोय
मेढा ही फक्त एका गावची नगरपंचायत असली, तरी तालुक्‍याचे ठिकाण असल्यामुळे येथे रोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शासकीय कार्यालये, मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामध्ये विशेष करून महिलांची नैसर्गिक विधीची सोयच नसल्याने कुचंबना होते. गेली अनेक वर्षे हा प्रश्न सुटलेला नाही. ‘स्वच्छ आणि सुंदर मेढा’ ही संकल्पना मागे पडताना दिसते. मेढा बाजारपेठेत रहदारीच्या ठिकाणी अगदी तहसील कार्यालयालगत घाणीचे साम्राज्य आहे. वेण्णा चौक, नवीन बस स्थानकाकडे जाताना असलेल्या रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे डास वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आहे.

राजकारणाचा बट्ट्याबोळ!
मेढ्याचे राजकारण वेगळ्या स्थितीत आहे. अपक्षांच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत. नुकत्याच निवडी झाल्या आहेत. शिवसेनेकडे नगराध्यक्षपदासह पाच नगरसेवक आहेत. दोन अपक्ष साथीला व एक भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे आठची संख्या शिवसेना युतीकडे आहे. राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपदासह सात नगरसेवक असून, दोन अपक्षांची साथ मिळाल्याने नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादीकडे बहुमत आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी शिवसेनेचे हातचे नगरसेवक पद जाऊन भाजपने एक नगरसेवक पदावर स्वीकृत नगरसेवकपद आपल्याकडे मिळवून ताकद वाढविली. त्यामुळे सध्या शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे मेढ्याच्या नगरपंचायतीत सत्ता कुणाची व विरोधक कोण अशी अवस्था आहे. सध्या पदाधिकाऱ्यांकडून समन्वय साधून मेढ्याचा विकासाला गती मिळणार का राजकारणच शिजणार हे काळच ठरवेल. 

तीन वर्षांपासून पाणी योजनेची बोंबाबोंब
मेढ्याला जीवन प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असला, तरी वीजबिल थकबाकीमुळे दर महिन्याला विद्युतपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे येथे पाण्याची बोंबाबोंब तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. एक तर मेढ्यात एक दिवसाड पाणी येते. तेही फक्त अर्धा तास. त्यामुळे ‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी अवस्था आहे. दर निवडणुकीत पाण्याचा प्रश्न गाजतो. त्यानंतर का आटतो, असा प्रश्नही येथील जनतेला पडला आहे. त्यामुळे कायमचा पाणीप्रश्न मिटणे गरजेचे आहे.

महत्त्वाचा पाणी, त्यानंतर स्वच्छतागृह आणि आरोग्य हे तीन जीवनाशी निगडित प्रश्न प्राधान्याने मार्गी लागणे गरजेचे आहे. अन्यथा माहिलांमधूनच उद्रेक होईल.
- गौरी पवार, नगरसेवक, मेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com