मिरजेत ३० तास विसर्जन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पारंपरिक वाद्यांच्या गजरात निरोप - गुजरात,  कर्नाटकातील कलाकारांनी मने जिंकली

मिरज - पारंपरिक वाद्यांचा गजर आणि लोककलांच्या अफलातून सादरीकरणाने मिरजेचा विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साह, शांततेत झाला. तब्बल ३० तास तो रंगला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात निरोप - गुजरात,  कर्नाटकातील कलाकारांनी मने जिंकली

मिरज - पारंपरिक वाद्यांचा गजर आणि लोककलांच्या अफलातून सादरीकरणाने मिरजेचा विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साह, शांततेत झाला. तब्बल ३० तास तो रंगला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी कृष्णा नदीत शेवटच्या पोलिस प्रशासनाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाने संपला. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या विसर्जन सोहळ्यात तब्बल १९३ मंडळांनी भाग घेतला. गुजरात, कर्नाटकसह शेकडो परप्रांतीय कलाकारांनी कला सादर करीत भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रात्री बाराच्या ठेक्‍याला मात्र सर्व काही  शांत झाले. त्यानंतर सकाळी काहींनी नदीकडे जाताना वाद्ये वाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अटकाव केला. मिरवणूक संपेपर्यंत महसूल, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मिरजेत थांबून होते. 

काल (मंगळवारी) सकाळी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. नदी वेसच्या शिवाजी मंडळाने टाळ-मृदुंगांचा निनाद, हरिनामाचा गजर करीत मिरवणूक काढून लक्ष वेधून घेतले. सकाळी आठ वाजता मिरवणूक सुरू झाली. शेकडो वारकरी आणि हजारो भाविकांनी शिस्तबद्धपणे मिरवणूक काढली.

पारंपरिक वेशातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. नऊवारी साडी, डोक्‍यावर तुळशी वृंदावन कपाळी बुक्का आणि मुखात हरिनाम अशा वातावरणात शिवाजी मंडळाची मिरवणूक सुरू झाली. पालखीत विराजमान गणेशाच्या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. मार्केट परिसरात रिंगण  सोहळा झाला. महिलांसह पुरुषांनीही फुगडीचा फेर धरला. दुपारी साडेबारा वाजता विसर्जन झाले. 

त्यानंतर हळूहळू ब्राह्मणपुरी, कमानवेस, तानाजी चौक, नदीवेसच्या मंडळांनी मिरवणुका सुरू केल्या. रात्री दहापर्यंत मार्केट गजबजले. मंडळांनी पोलिसांचा डोळा चुकवून एक बेस डॉल्बी लावण्याचाही प्रयत्न केला. काहींनी ढोल, ताशा, धनगरी ढोल, पारंपरिक बॅंड, बेंजो, अन्य कलाप्रकारही सादर करीत मिरवणुका काढल्या. 

बहुसंख्य मंडळांनी ढोल-ताशा पथक आणि बॅंड पथकांच्या सादरीकरणावर भर दिला. काहींनी, वाघ्या मुरळी, गोंधळही सादर केला. ड्रम बॅंडचाही एक नवा प्रकार अंबिका मंडळाने सादर केला. कर्नाटकातून आलेल्या धनगरी ढोलांच्या पथकाने तर धमाल उडवली. तीस कलाकारांच्या पथकाने विविध कौशल्यपूर्ण प्रकार सादर केले. भक्तांची मने जिंकली. मिरजेसह हरिपूर, बेळगाव, कागवाड, शिरगुप्पी, सौंदत्तीसह शेजारील गावांतील बॅंडमधील कलकारांनीही मराठी, हिंदीसह  कानडी गाणी सादर करून भक्तांची मने जिंकली. ढोल ताशा पथकांनी तर त्यात भर घातली. इचलकरंजीच्या पन्नासभर महिलांच्या पथकाने तालबद्ध पद्धतीने सादर केलेल्या ढोल- ताशांच्या निनादाने भक्तांचे लक्ष वेधले. हे पथक आठ तास वादन करीत होते. गुजरात, राजस्थान सीमेवरून आलेल्या डझनभर कलाकारांच्या कलासादरीकरणोने तर धमाल केली. पारंपरिक वाद्ये ही डॉल्बी, ढोल ताशालाही भारी ठरली. याच पथकातील महिलांची नृत्य, अदाकारी डोळ्याचे पारणे फेडणारीच. पथकातील काही पुरुषांनी महिलांच्या बरोबरीने डोक्‍यावर काचेचे ग्लास, त्यावर मातीचे मडके, यासारख्या वस्तू ठेवून केलेली नृत्ये ठोका चुकवणारीच. महिला, पुरुषांच्या नेत्रदीपक सादरीकरणामुळे हजारो भक्तांनी डॉल्बी सोडून या कलेचा मनमुराद आनंद लुटला.

पांरपरिक ब्रास बॅंडलाही चांगले दिवस आल्याचे दिसले. बऱ्याच वर्षांनी मंडळांनी बरे पैसे दिल्याची प्रतिक्रिया कर्नाटकातील प्रसिद्ध बॅंड मास्टरनी व्यक्त केली.  बेळगाव, सौंदत्ती, शिरगुप्पी, कागवाड, मायाक्का चिंचणी येथून पाचशेहून अधिक कलाकार आले होते. या सर्वांना डॉल्बीवरील बंदीमुळे बऱ्यापैकी बिदागी मिळाली. 

कल्लाप्पा बजंत्री म्हणाले, '‘सैराट’ फेम नागराज मंजुळेच्या करमाळ्यापासून ते कर्नाटकातील हुबळी धारवाडपर्यंतच्या शेकडो बेंजो पथकानांही यावर्षी कला सादर करण्याची संधी मिळाली. काही हलगी वादकांनीही कला सादर केल्या. उडत्या चालीवरील गाणी आणि  त्यावर थिरकणारी तरुणाई असेही चित्र बेंजो पथकांमुळे मिरवणुकीत पहायला मिळाले.

दृष्टिक्षेपात मिरवणूक 
मंगळवारी सकाळी आठ वाजता मिरवणुका सुरू.
मिरवणुकांचे ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत.
मुस्लिम संघटनांकडून ठिकठिकाणी पाण्यासह खाद्यपदार्थांचे वाटप.
मुस्लिम तरुणांच्या एका गटाने राबवली मोफत प्रथमोपचारांची मोहीम.
दारूबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे हुल्लडबाजी दिसली नाही.
मिरवणुकीवर मिरजेतील व्यापारी संघटनेसह अन्य मान्यवरांचे विशेष लक्ष.
तब्बल पन्नासभर कॅमेऱ्यांद्वारे मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर.
मोठ्या मूर्तींच्या विसर्जनास होणाऱ्या विलंबामुळे मिरवणूक लांबली.

वादावादी, भांडणाचे किरकोळ प्रकारही नाहीत
एवढ्या मोठ्या व तब्बल तीस तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्यात यावर्षी प्रथमच कार्यकर्त्यांत आपसात किरकोळसुद्धा वादावादी झाली नाही. पोलिसांनी स्वतंत्र तयारी केली होती. पण कार्यकर्ते, गल्ली  बोळातील कारभाऱ्यांनी विशेष काळजी घेतली.

एलसीडीवर नेत्यांची कुरघोडी
मिरवणूक मार्गावर डिजिटल लावण्यास बंदी आल्याने काही चमको नेत्यांनी मंडळाच्या माध्यमातून ‘एलसीडी’ द्वारे आपल्यासह पोराबाळांची छबी सादर केली.  मिरवणूक कोणाची गणेशमूर्तीची की या नेत्यांची अशी चर्चा होती.
 

कलाकांराना बरे दिवस
डॉल्बीवरील बंदीमुळे पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा, ब्रास बॅंड, बेंजोसारख्या वाद्यवृंदातील कलाकारांना बऱ्यापैकी बिदागी मिळाली. डॉल्बीबंदीचा असाही सकारात्मक परिणाम पहायला मिळाला. त्यामुळे कलाकारांनी पोलिस, मंडळांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

मोठ्या मूर्तींचे दान
विसर्जन व्यवस्थेत काही उंच, मोठ्या मूर्तींचे विसर्जन करणे अशक्‍य ठरल्याने त्यांचे संबंधित मंडळांनी  विसर्जन करणे टाळून मूर्तिदान करण्याचा निर्णय त्वरेने घेतला.

डॉल्बीवाल्यांवर कारवाईचे संकेत
मिरवणुकीत काही मंडळांनी एक बेसच्या नावाखाली डॉल्बी वाजवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला खरा; पण पोलिसांनी अशा चुकारांच्या चित्रफिती बनवून त्यांच्याविरुद्ध वेगळ्या कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे नियोजन केले आहे. 

शेवटपर्यंत वरिष्ठांची उपस्थिती
पोलिस दलाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होईपर्यंत पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि प्रांताधिकारी डॉ. विकास खरात कृष्णाकाठी थांबून होते. विसर्जन लांबवण्यासाठी आढेवेढे घेणाऱ्या कार्यकर्त्यांवरही करडी नजर होती.