मृत बालिकेच्या कुटुंबीयांना 15 लाखांच्या भरपाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

मिरज - भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिन्मयी उमेश कारंडे (वय 2) या बालिकेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने दिल्याची महिती ऍड. मनीष काबंळे, सुरेश हराळे, दीपक ढवळे यांनी दिली.

ज्या कत्तलखान्यामुळे या परिसरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढली आहे, त्या कत्तलखान्यात नियमांचे उल्लंघन होत असल्यास महापालिकेवरही कारवाई करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. मिरज- बेडग रस्त्यावर राहणाऱ्या चिन्मयी कारंडे या बालिकेवर 30 एप्रिल 2010 रोजी मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेबाबत ऑल इंडिया ह्युमन राइट्‌स असोसिएशन या मानवी हक्कांसाठी कार्यरत असणाऱ्या संघटनेने महापालिका आणि पोलिस प्रशासनाविरुद्ध राज्य मानवी हक्क आयोगाकडे 18 मे 2010 रोजी तक्रार केली होती. पोलिस उपअधीक्षकांनी दिलेला अहवाल आणि कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांना अनुसरून राज्य मानवी हक्क आयोगाने नगरविकास विभागाला कारंडे कुटुंबीयांना पंधरा लाख रुपये निकाल लागल्यापासून तीन महिन्यांत देण्याचे आदेश दिले होते. हा निकाल 10 एप्रिल 2017 ला आयोगाने दिला. हा आदेश होऊन तीन महिने उलटल्यानंतरही नगरविकास विभागाकडून कार्यवाही झाली नसल्याचे हराळे यांनी सांगितले.