गणपती विसर्जनासाठी वीस किलोमीटरचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कृष्णा घाटावर विसर्जन - भीषण पाणीटंचाईमुळे मिरज तालुक्‍यात स्थिती 

मिरज - मिरज तालुक्‍यात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. सर्व तलाव, ओढे-नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गणपती विसर्जनासाठी मंडळे वीस-तीस किलोमीटरचा प्रवास करून मिरजेला कृष्णा नदीवर येत आहेत. 

कृष्णा घाटावर विसर्जन - भीषण पाणीटंचाईमुळे मिरज तालुक्‍यात स्थिती 

मिरज - मिरज तालुक्‍यात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. सर्व तलाव, ओढे-नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गणपती विसर्जनासाठी मंडळे वीस-तीस किलोमीटरचा प्रवास करून मिरजेला कृष्णा नदीवर येत आहेत. 

गेल्या दहा-पंधरा वर्षांत प्रथमच इतके गंभीर पाणीसंकट ओढवले आहे. आजवर गणपती विसर्जनासाठी कोठे ना कोठे थोडाफार पाणीसाठा असायचा; यंदा सगळ्यांचेच तळ उघडे पडले आहेत. जूनपासून आजअखेर एकदाही धो-धो पाऊस झाला नाही. गणेशाच्या आगमनासोबत पाऊसही येईल अशी आशा होती; तीही फोल ठरली. दुष्काळी स्थितीमुळे म्हैसाळ प्रकल्पातून शासनाने पाणी सोडले; पण पूर्व भागाला अद्याप पाणी मिळाले नाही. वितरणाच्या धोरणानुसार पहिल्या टप्प्यात जत  तालुक्‍याला पाणी देण्यात येत आहे; त्यामुळे मिरज पूर्व भाग कोरडाच आहे. गणपती विसर्जनासाठी तरी तलावांत पाणी सोडा, अशी मागणी मंडळांनी व ग्रामस्थांनी केली होती; त्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. सध्या सर्वच मंडळांना गणपतीविसर्जन कोठे करायचे ? असा प्रश्‍न पडला आहे. त्यावर उपाय म्हणून कार्यकर्ते मिरजेला धाव घेताहेत. 

आरगमधील तरुण मित्र मंडळाने चक्क वीस  किलोमीटरचा प्रवास करून गणेशमूर्ती मिरजेत आणली. कृष्णाघाटावर कृष्णा नदीत विसर्जित केली. मंगळवारी या मंडळाने विसर्जनाची मिरवणूक काढली होती. रात्री मिरवणूक संपल्यानंतर मूर्ती गावतळ्याकडे नेण्याचे नियोजन होते; पण पाणी नसल्याने म्हैसाळ प्रकल्पाच्या कालव्यात नेण्याचा प्रयत्न झाला. मंडळाचे अध्यक्ष संतोष किनिंगे व कार्यकर्ते संदेश पोतदार, सूरज आरगे, सागर पोतदार, अजय उपाध्ये, बंडू आरगे यांनी सांगितले की, गावतळ्यात पाणी नसल्याने आठ फुटांची मूर्ती म्हैसाळ योजनेच्या कालव्यात  विसर्जित करता आली नाही; त्यामुळे परत मंडपात नेऊन ठेवली. आज सकाळी जीपमध्ये घालून मिरजेला आणली व कृष्णेत विसर्जन केली. सत्यप्रेमी मंडळाने त्याच रात्री मिरज गाठून विसर्जन केले. बेडग, लिंगनूर, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, मालगाव, टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी या गावांतही अशीच गंभीर स्थिती आहे.  

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर
पावसाळ्याचे दिवस संपत आले तरी या गावांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. आरग, बेडग, मालगाव, सलगरे, एरंडोली, सोनी, भोसे या मोठ्या गावांना चार ते पाच दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. म्हैसाळ प्रकल्पाच्या पाण्यातून तलाव भरून देण्याची मागणी होत आहे.