मिरज सिव्हिलमध्ये ॲक्‍सिडेंट अँड इमर्जन्सी विभाग

मिरज सिव्हिलमध्ये ॲक्‍सिडेंट अँड इमर्जन्सी विभाग

स्वतंत्र विभाग - मेट्रो सिटी धर्तीवर मुंबई, पुणेनंतर मिरजेत प्रकल्प

मिरज - मिरज शासकीय रुग्णालयात स्वतंत्र अपघात विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. शस्त्रक्रियेसह सर्व उपचार काही मिनिटांत एकाच  छताखाली अपघातग्रस्तांना मिळतील याची काळजी या विभागात घेण्यात येईल. मेट्रो सिटीच्या धर्तीवर ही  सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. 

परदेशातील इस्पितळांत व देशातील मेट्रो सिटीतील काही इस्पितळांत अशी सुविधा उपलब्ध आहे. अपघातग्रस्त रुग्णाला प्रथमोचारापासून शस्त्रक्रियेपर्यंतची कार्यवाही एकाच कक्षात केली जाते. अतिदक्षता विभाग, रक्तपुरवठा, छोटेखानी शस्त्रक्रियागृह, कृत्रिम  श्‍वसनयंत्रणा आदी सुविधा येथे असतील. तातडीच्या उपचारांत तज्ज्ञ असणारा डॉक्‍टरांचा ताफा २४ तास उपलब्ध असेल. अपघात झाल्यापासून उपचार सुरू होईपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. वैद्यकीय भाषेत याला ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते. हृदयविकाराचा झटका आलेल्यांसाठी गोल्डन अवर महत्त्वाचा असतो.

प्रचलित दवाखान्यांत तातडीचा रुग्ण दाखल होताच वेगवेगळ्या डझनभर विभागांत स्ट्रेचरवरून पळवत न्यावे लागते. स्कॅनिंग, एक्‍सरे, एमआरआयसाठी धावाधाव करताना  रुग्ण व नातेवाईकांचा जीव कंठाशी येतो. वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी न्यावे लागते. कॅज्युलिटीच्या नावाखाली उपलब्ध असणारा कक्ष ‘ऑल इन वन’ याच भूमिकेत असतो. गंभीर अपघातग्रस्तांसाठी तो शंभर टक्के उपयोगी ठरेलच याची शाश्‍वती नसते. 

हे लक्षात घेऊन मिरज शासकीय रुग्णालयात स्वतंत्र ॲक्‍सिडेंट अँड इमर्जन्सी डिपार्टमेंट सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्यातील सरकारी दवाखान्यांतील पहिलाच उपक्रम असेल. या विभागातील सेवेसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे, असे डॉ. सापळे म्हणाल्या. वैद्यकीय परिषदेकडून परवान्यांची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांत मिरजेत आणि कालांतराने सांगलीतही हा विभाग सुरू करण्याचे नियोजन आहे. अपघातग्रस्ताला काही सेकंदांत सर्व आवश्‍यक उपचार देऊन त्याचा जीव वाचवणे हा उद्देश स्वतंत्र विभाग सुरू करण्यामागे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com