मिरज तालुक्‍याचे पाणी पळवाल तर खबरदार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मिरज - मिरज तालुक्‍याचे पाणी पळवण्याचा प्रयत्न अजिबात सहन करणार नाही, असा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी दिला. मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी वर्षातील पाणीउपशाच्या नियोजनासाठी बैठक बोलावली होती. कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांच्यासह अधिकारी व तालुक्‍यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

मिरज - मिरज तालुक्‍याचे पाणी पळवण्याचा प्रयत्न अजिबात सहन करणार नाही, असा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी दिला. मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी वर्षातील पाणीउपशाच्या नियोजनासाठी बैठक बोलावली होती. कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांच्यासह अधिकारी व तालुक्‍यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

योजनेच्या थकबाकीची सद्यस्थिती, शासनाकडून येणेबाकी, पाणी वितरणासाठी योजनेची तयारी, पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी आणि अडचणी यांचा आढावा घोरपडे यांनी घेतला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले,""मंत्री हुकूमशाहीच्या पद्धतीने काम करत आहेत. कालच्या बैठकीत पाण्याचा विषय सोडून बोला असे फर्मावण्यात आले होते. शेतकऱ्यांविषयी आस्था नसल्याने प्रश्‍न ऐकून घेण्यास मंत्री तयार नाहीत. अशा वागण्याने शेतकरी उद्‌ध्वस्त झाल्याविना राहणार नाही. पाण्याच्या भरवशावर तालुक्‍यात बागायती झाल्या. एकट्या मालगावात सहा हजार एकरवर द्राक्षबागा झाल्या. एक एकरसाठी पाच ते सहा लाखांचा खर्च होतो; या हिशेबाने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली. पाण्याअभावी ती उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.'' 

श्री. घोरपडे म्हणाले,""पाण्याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या जाणून घेण्यासाठी कवठेमहांकाळ व मिरजेत बैठका घेतल्या. त्यांना साक्षीदार म्हणून अधिकाऱ्यांना हजर राहण्यास सांगितले. बैठकांचे रेकॉर्डिंग केले आहे. ते कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांपुढे नेणार आहोत. तेथे निर्णय झाला नाही तर मंत्र्यांपुढे जाऊन बसू. योजनेचे पंप दुरुस्तीला आले आहेत. पुरसे कर्मचारी नसल्याने कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. अशाने योजना सुरळीत चालणार तरी कशी ? 

लाभक्षेत्राच्या मोजणीची निश्‍चित यंत्रणा नाही, पंधरा वर्षांनंतरही पाणीवाटप सोसायट्या स्थापनेत राजकारण सुरू असून त्यात अधिकारी हस्तक्षेप करताहेत या बाबी गंभीर आहेत. बेजबाबदार मंत्र्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

शेतकऱ्यांनी यावेळी पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी आणि सूचनांचा पाऊस पाडला. अभियंता नलवडे यांनी समर्पक खुलासे केले. पैसे भरल्याविना प्रकल्प सुरू होणार नाही हे स्पष्ट केले.'' तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, बाजार समितीचे संचालक दीपक शिंदे, पंचायत समिती सदस्य दिलीप बुरसे, अरुण राजमाने, शंकर पाटील, आबासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र माळी, आबा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकरराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील, जीवन पाटील आदी उपस्थित होते. 

पवनचक्कीचा पर्याय 
म्हैसाळ प्रकल्पासाठी 1 रुपये 42 पैसे प्रतियुनिट दराने वीज मिळते. महागड्या विजेमुळे म्हैसाळचे पाणी शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे; त्यामुळे प्रकल्पासाठी पवनचक्‍क्‍यांद्वारे वीज मिळवण्याचा विचार करावा लागेल, असे घोरपडे म्हणाले. 

बैठकीत मांडलेला म्हैसाळ प्रकल्पाचा लेखाजोखा असा ः 
--- 2015-16 मध्ये 150 दिवस उपसा, 8.31 टीएमसी पाणी उचलले 
-- पाच तालुक्‍यांतील 14 हजार हेक्‍टरला पुरवठा 
--- एकूण वीजबिल 26.45 कोटींवर 
--- दुष्काळी भाग म्हणून 33.50 टक्के सूट मिळाली 
--- शेतकऱ्यांनी 2 कोटी 10 लाख भरले 
-- साखर कारखान्यांनी 4 कोटी 10 लाख दिले 
-- एकूण थकबाकी 16 कोटी रुपये 

Web Title: Miraj taluka water