कर्जमाफीवरून सरकारकडून दिशाभूल  - सतेज पाटील

कर्जमाफीवरून सरकारकडून दिशाभूल  - सतेज पाटील

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अभ्यास सुरू असल्याचे सरकार खोटे सांगत असून, पाशवी बहुमताच्या जोरावर हा निर्णय सरकार लांबवत आहे. दुसरीकडे स्वतःची विधेयके मात्र मंजूर करण्याचा सपाटा सरकारने लावला असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. 

कोल्हापुरात 25 व 26 एप्रिलला येणाऱ्या सर्वपक्षीय संघर्ष यात्रेच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कॉंग्रेस कमिटीत ही बैठक झाली. शाहू महाराजांच्या जन्मभूमीतून सुरू होणाऱ्या यात्रेचा आवाज महाराष्ट्रभर पोचण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी या वेळी केले. 

ते म्हणाले, ""सलग तीन वर्षे कमी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेला दुष्काळ यामुळे शेतकरी चक्रव्यूहात सापडला आहे. वर्षानुवर्षे कर्ज घेणारा हा शेतकरी कर्जाची परतफेडही कायम करतो. सलगच्या नापिकीमुळेच कर्जमाफीची आता गरज आहे. वारंवार कर्जमाफी द्यावी, ही मागणीच नाही. आता मात्र या कर्जमाफीसाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय असल्याने सर्व विरोधकांच्यावतीने ही संघर्ष यात्रा सुरू आहे.'' 

ते म्हणाले, ""अधिवेशनात आम्ही ही मागणी लावून धरली. त्याची दखल सरकार घेईल, असे वाटत होते पण ही मागणी करणारे आमदारच निलंबित करून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. कर्जमाफीचा अभ्यास सुरू असल्याचे सरकारला सांगण्याची गरज आहे. राज्यातील बॅंकांची बैठक होते. जिल्हा पातळीवरही या बैठका होतात. त्यात ही माहिती असते. राज्यात 1 कोटी 36 लाख शेतकरी आहेत, यापैकी 30 लाख शेतकरी कर्जदार आहेत. ही माहिती उपलब्ध असताना अभ्यास करण्याच्या नावावर सरकार वेळ मारून नेत आहे.'' 

विरोधकांकडून एखादा विषय ताणून धरला, की सरकार विविध माध्यमांतून विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. दूरचित्रवाणीवर या संदर्भातील चुकीच्या चर्चा घडवून आणून चर्चा दुसरीकडेच नेण्याचे षड्‌यंत्र सुरू आहे. म्हणून या संघर्ष यात्रेची तीव्रता वाढवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची ताकद दाखवल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही हे ओळखून या संघर्ष यात्रेत मोठ्या संख्यने सहभागी व्हा. गावोगावी संघर्ष यात्रेचे स्वागत करा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. 

शंकरराव पाटील-शिंगणापूरकर यांनी स्वागत केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी, इचलकरंजीचे शशांक बावचकर, शिरोळचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अंजना रेडेकर, संजय पाटील यांची भाषणे झाली. सचिन घोरपडे यांनी आभार मानले. 

बैठकीला जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, भगवान पाटील, उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी सदस्य बाबासाहेब माळी, इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक विलास गाताडे, रुकडीचे भगवान पाटील आदी उपस्थित होते. 

अशी असेल संघर्ष यात्रा 
मंगळवार ता. 25 - सकाळी नऊ वाजता कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थान येथून सुरवात, 10 वाजता महालक्ष्मी दर्शन, 12 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात पत्रकार परिषद, तेथून कागल, निढोरीमार्गे आदमापूर येथे बाळूमामा देवस्थान, तेथून मुदाळतिट्टा येथे सभा दुपारी 12 वाजता, दुपारी तीन वाजता कोल्हापुरात आगमन, दसरा चौकात सभा, सायंकाळी संघर्ष यात्रा जयसिंगपूरकडे रवाना, सायंकाळी सहा वाजता जयसिंगपूर येथे सभा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com