हरवलेला शुभम "व्हॉट्‌सऍप'मुळे आला घरी!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

सोलापूर - ...हा मुलगा हरवला आहे त्याची माहिती फॉरवर्ड करा, असे मेसेज व्हॉट्‌सऍपवर रोजच येतात. अनेकदा ते मेसेज खोटेही असतात.. पण दोन दिवसांपूर्वी सोलापूरचे पुस्तक प्रकाशक संजय देडे यांनी असाच एक मेसेज मित्रांना पाठविला. त्यांच्या मेसेजमुळे चार महिन्यांपूर्वी हरवल्यानंतर बारामतीमधील बालसुधारगृहात राहत असलेल्या शुभम व्हनकडे या मुलाची व कुटुंबीयांची भेट झाली.

शुभम हा मूळचा कोल्हापूरचा. त्याच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने त्याला सोलापुरात मामा श्रीकांत कांबळे आणि आजी आशाबाई कांबळे यांच्याकडे पाठविले. तो महापालिकेच्या शाळेत जातो. चार महिन्यांपूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. मामा आणि आजींनी शुभमचा शोध घेतला; पण तो सापडला नाही. हरवलेल्या शुभमच्या आठवणींनी आई, मामा आणि आजी व्याकूळ झाले होते. सोलापूरचे पुस्तक प्रकाशक आणि विक्रेते संजय देडे हे शुक्रवारी (ता. 25) बारामती येथील बालसुधारगृहात पुस्तक प्रदर्शनानिमित्त गेले होते. तेथील शिक्षकांनी तुमच्या सोलापूरचा शुभम नावाचा मुलगा आमच्याकडे आहे असे सांगितले. उत्सुकतेने श्री. देडे यांनी शुभमची भेट घेतली. गोंधळलेला शुभम फार बोलला नाही, सोलापूरला मामाकडे राहतो, असे त्याने सांगितल्यावर श्री. देडे यांनी सहज म्हणून मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढला. काही वेळाने त्याचा फोटो आणि थोडक्‍यात माहिती व्हॉट्‌सऍपवर शेअर केली. त्यांनी पाठविलेला मेसेज शनिवारी दुपारपर्यंत अनेक ग्रुपवर फिरत होता. एका तरुणाने तो मेसेज शुभमचे मामा श्रीकांत कांबळे यांना दाखविला. त्यानंतर त्यांनी श्री. देडे यांच्याशी संपर्क केला. शुभम व्यवस्थित असल्याने श्री. देडे यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून बारामती बालसुधारगृहाशी संपर्क साधण्यात आला. शनिवारी सायंकाळी बारामतीला जाऊन मामा आणि आजीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून शुभमला घरी आणले आहे.