मदरशांतून मिळतेय आधुनिक पद्धतीचे शिक्षण

मदरशांतून मिळतेय आधुनिक पद्धतीचे शिक्षण

वाघेरीमध्ये तांत्रिक कौशल्य विकसित करण्याचा कोर्स; नोकरीसाठी मार्गदर्शनही

कऱ्हाड - मुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांनी चालू घडमोडींसह अत्याधुनिक शिक्षण पद्धत आत्मसात करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले दिसते. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील मदरशांतून पारंपरिक शिक्षणाची ओढ कायम ठेवत आधुनिक शिक्षणाची चोखळलेली वाट मुस्लिम समाजासाठी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. 

मदरसा म्हटल की, पूर्वीपासून धार्मिक शिक्षण देणारी संस्था अशीच ओळख आहे. ती ओळख बदलून नवीन शिक्षण पद्धत आत्मसात केली आहे.

मदरशांमध्ये व्यावसायिक शिक्षणासह दहावीची परीक्षा दिली जाते. संगणक अभ्यासक्रम शिकवला जातो. गणित, मराठीसारखे विषय घेतले जातात. त्यामुळे नव्या पिढीला केवळ ठराविक शिक्षण नव्हे तर सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने होताना दिसतो. अरबीचा आग्रह तेथे आहेच, अन्य शिक्षणाचीही आवड निर्माण व्हावी, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. 

शालेय शिक्षण अपूर्ण राहणाऱ्या व धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम युवकांमध्ये तांत्रिकदृष्ट्या किमान कौशल्य विकसित करण्यासाठी 
वाघेरी येथील मदरशात हाजी सुलतान पटेल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरद्वारा शासमान्य सर्टिफिकेट कोर्स सुरू आहे. त्यांतर्गत मदरशात स्वतंत्र शालेय व व्यवसाय शिक्षण विभाग सुरू होत आहे. किमान आठवी ते बारावी पास व मदरशातून हाफीज, आलीम शिक्षण प्राप्त असलेल्या युवकांसाठी व्यवसायाचे व्यावहारिक शिक्षण व त्यानंतर प्रशिक्षण (ॲप्रेंटिस) देवून त्यांना स्वयंरोजगारासाठी तयार केले जात आहे. हे व्यवसाय प्रशिक्षण सेंटर पथदर्शी ठिकाण बनू पाहात आहे. तेथे कॉम्प्युटर, इलेक्‍ट्रीकल, फॅब्रिकेशन, ई- सेवा, टेलरिंग, फॅशन डिझाईनिंगसारखे विविध कोर्सेस शिकवले जाणार आहेत. स्वतंत्र तांत्रिक प्रशिक्षकांची सोय आहे. हे सेंटर ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालवले जात आहे. कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण तेथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रशिक्षित विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व नोकरीसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. बेरोजगारी हटवून आत्मनिर्भर, सक्षम व सुसंस्कृत पिढी घडविणारी पायवाट मळू लागल्याचे दिसत आहे. त्याचपद्धतीचे आशादायक, प्रेरणादायी काम सुरू आहे. मलकापूरच्या मदरशामध्ये दहावीचे शिक्षण दिले जाते. दहावीचे वय होणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरून परीक्षेस बसवले जाते. त्यासाठीची सगळी तयारी मदरशाद्वारे होते. 
 

गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मदरशांत प्रवेश
कऱ्हाड तालुक्‍यात वाघेरी, गोटेसारख्या गावांत मुस्लिम परंपरा आहेत. शहरातील मुस्लिम मतदारांची संख्या १७ हजार इतकी आहे. तालुक्‍यात सात मदरसे आहेत. दोन उर्दू शाळा आहेत. वाघेरी व मलकापूर येथे मोठे व अन्य लहान मदरशांत किमान ५०० विद्यार्थी शिकताहेत. शिक्षण घ्यायचे आहे. पण, आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदरशात प्राधान्याने प्रवेश दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com