पन्‍हाळा येथे घडणार आधुनिक प्लम्बर

Modern-Plumber
Modern-Plumber

कोल्हापूर - पन्हाळा म्हणजे ऐतिहासिक किल्ला, थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन. अशा ओळखीला आता पन्हाळा म्हणजे आधुनिक प्लम्बिंग कारागिरांचे देशातील एकमेव केंद्र अशी वेगळी जोड मिळणार आहे. प्लम्बिंग क्षेत्रातील प्रख्यात जग्वार कंपनीच्या सहकार्याने पन्हाळा वाघबीळ येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) आधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. आयटीआयमध्ये प्लम्बर म्हणून सध्या मिळणाऱ्या प्रशिक्षणापेक्षा आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे व आयटीआयमधून बाहेर पडताक्षणी त्याला रोजगाराचे दार खुले व्हावे, या हेतूने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. 

देशातील कोणत्याही आयटीआयमध्ये असे आधुनिक प्रशिक्षण मिळत नाही. जग्वारने वाघबीळसारखे निसर्गरम्य ठिकाण आणि या परिसरातील तरुणांना आधुनिक बदलाशी मिळताजुळता रोजगार मिळावा म्हणून या आयटीआयची निवड केली आहे. साधारण एक कोटी रुपये खर्च करून तेथे जग्वार लॅब उभारली आहे. या शैक्षणिक वर्षात त्याचे उद्‌घाटन होणार आहे. त्याची तारीख अद्यापही ठरलेली नाही. मात्र, दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये सध्या प्लम्बिंगचे प्रशिक्षण जरूर मिळते; पण आधुनिक बदलत्या काळात बाथरूम, स्वछतागृह, किचन, पेंट हाऊस, अपार्टमेंट, रो हाऊस, स्वतंत्र बंगल्यातील प्लम्बिंग यंत्रणा खूप अद्ययावत झाली आहे. त्यातली उपकरणे लाख रुपयांच्या घरातील आहे. दोन-अडीच लाख रुपये किमतीचे शॉवर आहेत. एकेक कॉक पाच ते दहा हजार रुपयांचा आहे. अर्थात त्याच्या जोडणीचीही पद्धत खूप वेगळी आहे. त्याची माहिती पारंपरिक प्लम्बरना नसते. अशी आधुनिक उपकरणे हाताळली नसल्याने त्याच्या दुरुस्तीचीही पुरेशी माहिती नसते. यात प्लम्बर मंडळींचा काही दोष नसतो. कारण त्याचा आधुनिक यंत्रणेशी संपर्क कमी आलेला असतो. नेमके हेच आधुनिक तंत्रज्ञान पन्हाळा वाघबीळ येथील आयटीआयमध्ये मिळणार आहे. त्यासाठी जग्वारने आपली सर्व आधुनिक उत्पादने तेथे आणली आहेत. त्याचा वापर त्याचे फिटिंग, त्याची दुरुस्ती कशी याचे तंत्रज्ञान तेथे दिले जाणार आहे. जेणेकरून पुणे, मुंबई, बंगळूर, चेन्नई किंवा देशातल्या कोणत्याही महानगरात या स्वरूपाचे काम तरुणांना मिळू शकणार आहे.

निसर्गरम्य वातावरणात लॅब 
पन्हाळा वाघबीळ येथील आयटीआय एका टेकडीवर निसर्गरम्य वातावरणात आहेत. अशा वातावरणात ही लॅब उभारण्यात आली आहे. आसपासच्या दहा-पंधरा गावांतील विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. प्राचार्य व्ही. बी. देशपांडे व प्लम्बिंग विभागप्रमुख अनिल क्षीरसागर हा विभाग सांभाळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com