लाखो भाविकांच्या साक्षीने कडेगावला ताबूत भेटी

- संतोष कणसे
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

मोहरमची १८६ वर्षांची परंपरा आजही कायम
कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणारे गगनचुंबी ताबूत आणि महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या सुमारे लाखांवर भाविकांच्या अलोट उत्साहात आणि ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’च्या जयघोषात येथे आज मोहरमनिमित्त ताबूत भेटीचा सोहळा झाला.

मोहरमची १८६ वर्षांची परंपरा आजही कायम
कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणारे गगनचुंबी ताबूत आणि महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या सुमारे लाखांवर भाविकांच्या अलोट उत्साहात आणि ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’च्या जयघोषात येथे आज मोहरमनिमित्त ताबूत भेटीचा सोहळा झाला.

तब्बल १८६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरमनिमित्त सोहोली, निमसोड व शिवाजीनगर येथील मानकऱ्यांनी आज सकाळी पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात ताबुतांची पूजा केली. दुपारी १२ वाजता सातभाईंचा मानाचा ताबूत प्रथम उचलण्यात आला आणि ताबूत भेटीचा सोहळ्याला प्रारंभ झाला. तर साडेबारा वाजता बागवान यांचा ताबूत उचलला आणि या दोन्ही ताबुतांची पटेल चौकात एक वाजता पहिली भेट झाली. हे ताबूत मिरवणुकीने मुख्य भेटीच्या ठिकाणी निघाले असता वाटेत शेटे, आत्तार, देशपांडे, हकीम, तांबोळी यांचेही ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर सुरेशबाबा चौकात शेख-इनामदार तसेच सुतार यांचे सर्वात उंच ताबूत व मजूदमाता ताबूतही दाखल झाले. देशमुख, शिंदे, शेटे, देशपांडे, कुलकर्णी आदी मानकऱ्यांनी पंजे भेटीच्या ठिकाणी आणले. या वेळी बुधवार पेठ मेल व शुक्रवार पेठ मेल यांच्यात नाथपंथीय गीतांचे सामने झाले.

राष्ट्रीय एकात्मतेची गीते गायली गेली. मानकऱ्यांनी ताबुतांचे पूजन केल्यानंतर दुपारी दीड वाजता महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या सुमारे लाखांवर भाविकांच्या अलोट उत्साहात आणि ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’च्या जयघोषात येथे सर्व ताबुतांच्या भेटीचा सोहळा  झाला. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यानंतर सांगता झाली.

या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, राजाराम गरुड, प्रांताधिकारी प्रवीण साळुंके, तहसीलदार अर्चना शेटे, सभापती आकांक्षा तांबेवाघ, उपसभापती सखाराम सूर्यवंशी, जितेश कदम, जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, धनंजय देशमुख, इंद्रजित साळुंखे, चंद्रसेन देशमुख, रवींद्र देशपांडे, गुलाम पाटील, सुरेश निर्मळ, रविराज देशमुख, मुन्ना शेख, पांडुरंग डांगे, दीपक भोसले, विजय शिंदे, मालन मोहिते, सुनंदा निर्मळ, उदय देशमुख, अविनाश जाधव आदी उपस्थित होते. 

मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी स्वागत केले. शिवाजी चन्ने यांनी आभार मानले.

एकशे शहाऐंशी वर्षांपासून येथे मोहरम हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन साजरा करतात. उत्सवाने देशाला ऐक्‍याची शिकवण दिली. हा मुस्लिम सण असूनही हिंदू लोक मानकरी आहेत, तर हिंदूंच्या उत्सवात मुस्लिम मानकरी आहेत. येथील मोहरम सर्वधर्म समभावाची शिकवण देतो. त्यामुळे या उत्सवाची सर्वत्र महती आहे.
- डॉ. पतंगराव कदम, आमदार 

येथील मोहरमला तीर्थस्थळाचा दर्जा द्यावा, शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. येथील मोहरम हे हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक आहे.
- पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार