महापालिकेचा हाय अलर्ट

महापालिकेचा हाय अलर्ट

कोल्हापूर - पावसाचा वाढता जोर आणि शहरात पुराचे पाणी घुसण्याच्या भीतीने महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा २४ तासांसाठी तैनात झाली आहे. अग्निशमन यंत्रणेच्या सहा गाड्यांसह तीन पथके मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहेत. सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार वसाहत, बापट कॅम्प, खानविलकर पेट्रोल पंप ते रमणमळा, उलपे मळ्यापर्यंतच्या भाग, रामानंदनगर या भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

कावळा नाका, रिलायन्स मॉल, टिंबर मार्केट येथे पथके तैनात आहेत. स्थानक अधिकाऱ्यांसह सहा जणांचा यात समावेश आहे. कावळा नाका पथकावर बापट कॅम्पपासून, कदमवाडी ते व्हीनस कॉर्नरपर्यंतच्या भागाची जबाबदारी दिली गेली आहे. शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, सिद्धार्थनगरपासून रमणमळा ते नदीकाठच्या भागासाठी रिलायन्स मॉलचे पथक असेल. 

टिंबर मार्केटमधील पथकावर रामानंदनगर ओढ्यापासून ते उपनगराची जबाबदारी असेल, ज्या भागात पाणी येते, अशा भागावर २४ तास हे पथक लक्ष ठेवेल. 

सुतारवाडा परिसरात पाण्याची पातळी वाढत असल्याने रविवारी सायंकाळपासून वर्दी देण्यास सुरवात झाली आहे. पथकाकडे एक बोट, लाईफ जॅकेट, हैड्रोलिक कटर, असे साहित्य दिले गेले आहे.
अग्निशमनच्या स्तरावर दक्षता घेतली जात असताना विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हाय अलर्ट केले आहे. गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी. ताराराणी चौक येथे पथके कार्यरत राहतील. आठ तासांची कर्मचाऱ्यांची ड्यूटी संपल्यानंतर दुसऱ्या शिफ्टचे कर्मचारी तैनात होतील. 

दोन दिवसांपासून कोसळणारा पाऊस २००५ च्या महापुराची आठवण करून देणारा आहे. रंकाळा तलाव याच पावसात सांडव्यावरून वाहिला होता. शहरात व्हीनस कॉर्नरपर्यत पाणी आले होते. रमणमळा, कुंभार गल्ली, सुतारवाडा या भागातील नागरिकांचे स्थलांतर झाले होते. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी सध्या ४० फुटांवर आहे. ४३ फुटांनंतर धोक्‍याच्या पातळीची प्रवास सुरू होतो. पंपिंग स्टेशन पाण्याखाली जात असल्याने ४६ फुटांनंतर पाणी उपसा बंद होतो. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित होता.

पावसाने जोर धरल्याने महापालिकेची लिपिक वगळता विभागीय कार्यालये. अग्निशमन, पवडी अशी सर्व यंत्रणा रस्त्यावर लावली गेली आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले की पाण्याचा धोका आणखी वाढणार आहे. पूर येणाऱ्या भागातील लोकांच्या स्थलांतरणाची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

येथे पुराची भीती
बापट कॅम्प, जाधववाडी परिसर, राजीव गांधी झोपडपट्टी, शिरोली जकात नाका परिसर, कदमवाडी परिसर, साळोखे मळा, भोसले पार्क, महालक्ष्मीनगर, दलाल मार्केट परिसर, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर, नाईकमळा, पुंगावकर मळा, माळी मळा, दीप्ती पार्क, चित्रदुर्ग मठ दसरा चौक परिसर, न्यू पॅलेस परिसर, नाईक मळा,  शाहू पूल, व्हीनस कॉर्नर, राजहंस प्रिंटिंग प्रेस, महावीर गार्डन परिसर, रामानंदनगर, ओढ्याकाठची घरे, गायकवाड वाडा, जामदार क्‍लब, शंकराचार्य मठ, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव, गुणे बोळ, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, राजाराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, दुधाळी, गवत मंडई, शाहूपुरी कुंभार गल्ली, यादवनगर, गोमती पूल.

पर्यायी निवासी व्यवस्था 
प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी, जाधववाडी व्यायामशाळा, शाहू मार्केट सांस्कृतिक हॉल, माझी शाळा, समता हायस्कूल, तुळजाभवानी हॉल, कदमवाडी, हरिहर विद्यालय, न्यू पॅलेस मनपा शाळा, महसूल भवन हॉल, धान्य गोदाम, दत्त मंदिर व रमणमळा सांस्कृतिक हॉल, चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग, जरगनगर विद्यालय, शाहू विद्यालय (जुने विवेकानंद कॉलेज) शंकराचार्य मठ, आंबेडकर हॉल, अण्णासाहेब शिंदे विद्यालय, लक्षतीर्थ वसाहत. रानडे विद्यालय, उत्तरेश्‍वर पेठ, अंबाबाई मंदिर, शाहूपुरी, यादवनगर सांस्कृतिक हॉल.

धोकादायक भाग उतरविला
जुने कंदलगाव नाक्‍याजवळील झोपडपट्टी, सन्मित्र विद्यामंदिर शाळेचा धोकादायक भाग, गंजी माळ गल्ली येथील भिंत पाडली गेली. शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतील इमारतीचा भाग उतरविण्यात आला. विक्रमनगर उर्दू शाळेजवळ पाणी काढून मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी वाट करून देण्यात आली. विक्रमनगर नवदुर्ग कॉलनीजवळ रेल्वे रुळावरून पाणी वाहत होते. पाणी चर मारून अन्यत्र वळविले गेले. खानविलकर पंपाजवळ रस्त्यावर साठलेले पाणी चर मारून ओढ्याकडे वळविण्यात आले. 

आपत्कालीन संपर्कासाठी
०२३१-१०१
०२३१-२५३७२२१
०२३१-२५४११८८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com