महापालिकेची आज पहिली क्षेत्रसभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सांगली - महापालिकेची पहिली क्षेत्रसभा उद्या (ता.१०) प्रभाग क्रमांक पाचमध्ये होत आहे. उपमहापौर विजय घाडगे आणि निर्मला जगदाळे यांच्या प्रभागातील ही सभा दुपारी साडेचार वाजता कुपवाडमधील आंबा चौकात होणार असून, कायद्यातील तरतुदीप्रमाणे होणारी राज्यातील पहिलीच क्षेत्रसभा म्हणता येईल. उपमहापौर गट आणि स्वाभिमानी आघाडीच्या वीस नगरसेवकांनी गेल्या महिन्यात क्षेत्रसभांची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून जानेवारीपासून क्षेत्रसभांना प्रारंभ केला आहे.

उपमहापौर गटाने महापालिकेत भ्रष्टाचारविरोधी घेतलेल्या भूमिकेनंतर लोकांसमोर जायचा निर्णय घेतला आहे. क्षेत्रसभांची कायदेशीर तरतूद असूनही त्या घेतल्या जात नव्हत्या. याबाबत जिल्हा सुधार समितीने गतवर्षी आयुक्तांना नोटीस देऊन मागणी केली होती. समितीची ही भूमिका उपमहापौर गट आणि स्वाभिमानी आघाडीने पुढे नेत क्षेत्रसभांची स्वतःहून मागणी केली आहे. आयुक्तांनीही त्याला संमती दिली. यापुढे सर्वच प्रभागांमध्ये क्षेत्रसभा होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याचा प्रारंभ प्रभाग पाचपासून होत आहे. उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, उपमहापौर विजय घाडगे, सौ. निर्मला जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘गेले चार दिवस संपूर्ण प्रभागात जनजागृती सुरू आहे. नगरसेवक म्हणून आम्ही अनेक प्रश्‍नांची आजवर सभागृहात आणि प्रशासनासमोर मांडणी केली आहे. मूलभूत सुविधा देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आणि प्रशासन लोकांसमोर जाऊन प्रश्‍नांची सोडवणूक करणार आहोत. नागरिकांनी समस्या मांडण्यासाठी आणि प्रश्‍न सोडवून घेण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे. यातून झालेली कामे प्रकाशात येतील. प्रश्‍नांना तोंड फुटेल. अधिकारी आणि नागरिक आमनेसामने येऊन प्रश्‍नांची चर्चा करतील. शक्‍य त्या प्रश्‍नांचा जागेवरच निपटारा होईल. रखडलेल्या प्रश्‍नांची बाजू नागरिकांसमोर येईल. त्यातून नागरिकांची जागरूकता निर्माण होईल.’’

पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करीत आहोत. क्षेत्रसभा नागरिकांचा हक्क आहे. तो मिळवून देण्यासाठीही आम्हीच पुढाकार घेतला होता. अधिकार आणि कर्तव्ये याबाबत जागृती व्हावी. लोकांचा कारभारातला सहभाग वाढला तरच भ्रष्टाचारावर अंकुश ठेवता येईल. क्षेत्रसभा ही लोकसहभागाची चळवळ आहे. लोकांनी उपस्थित राहून जागरूक नागरिकत्वाची भूमिका पार पाडावी.
- उपमहापौर विजय घाडगे, गटनेते शेखर माने