गुडमाँर्निग पथकाच्या कारवाईनंतर 'देवगावा'त राडा

सुनील गर्जे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांना शिवीगाळ, तीन महिलांसह सहाजणांविरोधात पोलिसात तक्रार

नेवासे  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आभियाना अंतर्गत हागणदारी मुक्त गाव आभियाना सक्षमपणे राबविण्यासाठी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून नेवास पंचायत समितीच्या 'गुडमाँर्निग' पथकाने केलेल्या कारवाईनंतर हगणदारी मुक्तीच्या उंबरठ्यावर असणार्‍या देवगाव (ता. नेवासे) येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, भरारी पथक व कारवाईत पकडलेल्यांच्या नातेवाईकांत चांगलाच राडा झाला. पदाधिकार्‍यांनी नेवासे पोलिसात तीन महिलांसह सहाजणांविरोधत तक्रारी लेखी तक्रार दिली आहे. 

देवगाव हे नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार बाळासाहेब मुरकुटेंचे गाव. येथे गेल्या दोनवर्षांपासून हागणदारी मुक्त आभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून सध्या ८५ टक्के गाव हागणदारी मुक्त आहे. मात्र काही ग्रामस्थ जाणिवपुर्वक याकडे दुर्लक्ष करत असून ते आपल्या मुलांना श्रीराम माध्यमिक विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघड्यावर शौचास बसवत आसल्याने गेल्या स्वातंत्र्य दिनी झालेल्या ग्रामसभेत हा मुद्दा ग्रामस्थानी उपस्थित करून गावात गुडमाँर्निग पथक बोलवण्याची मागणी केली. त्यानुसार ग्रामपंचायतने पंचायत समितीला ठरावही पाठवला होता. 

ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज पहाटेच पंचायत समितीच्या गुडमाँर्निग पथकाने देवगाव येथे येऊन शौचास उघड्यावर बसलेल्या संजय नेटके (वय ४०) यास पकडले. ही बातमी समजताच त्याच्या नातेवाईकांनी पथकाच्या शासकीय वाहनास घेरावा घालून गोंधळ घालत संजयला पळवून लावले. पथकात पोलिस कर्मचारी असून देखिल  पथकाला कोणतीच कारवाई न करताच परतावे लागले. त्यानंतर संजयच्या नातेवाईक महिला व पुरुषांनी गुडमाँर्निग पथक बोलावले म्हणून सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा भरचौकात अश्लील भाषेत 'उद्धार' केला. 

याबाबत ग्रामपंचायत संरपच व सदस्य, ग्रामस्थानी तातडीची बैठक घेवून पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेत संरपच व सदस्यांनी कमल नेटके, लक्ष्मी नेटके, मिरा नेटके या महिलांसह वसंत नेटके, सागर नेटके, गणेश नेटके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करून कडक कारवाईची मागणी केली आहे. 

 

आज झालेल्या प्रकाराबद्दल पोलिसात लेखी तक्रार अर्ज दिलेला आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चाकरून पुढचा निर्णय घेऊ. गाव शंभरटक्के हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांच्याच सहाकार्‍याची अपेक्षा आहे.
- महेश निकम, सरपंच, देवगाव. ता. नेवासे.

"याबाबत तक्रार असून संबंधीत व्यक्ती फरार आहेत. त्यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना आज पोलीस ठाण्यात बोलावलेले असून त्यानंतर तक्रारदारांच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करू.
- प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक, नेवासे.

गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे आहे. झालेल्या प्रकाराबद्दल गुडमाँर्निग पथक पोलीस निरीक्षकांना रिपोर्ट करेल त्यानंतर पोलिस कारवाईचा निर्णय घेतील.
- सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी, नेवासे.