दुग्धोत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण बनविणार - जानकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

राहुरी विद्यापीठ - दुग्धोत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण बनवून इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर नेण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे, असे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले.

राहुरी विद्यापीठ - दुग्धोत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण बनवून इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर नेण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे, असे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले.

राज्याचा कृषी विभाग व "आत्मा'तर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात किसान आधार संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी जानकर बोलत होते. आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी आदी उपस्थित होते. गुजरातच्या "अमूल'प्रमाणेच महाराष्ट्रातही दुधाचा "आरे शक्ती' हा एकच ब्रॅंड सुरू करण्याचा मानस असल्याचा पुनरुच्चार करून जानकर म्हणाले, ""शेतकऱ्यांनी येथून पुढे शासकीय डेअऱ्यांनाच दूध घालावे. राज्यात रोज दीड कोटी लिटर दूध बाहेरच्या राज्यांतून येते. दुग्धोत्पादनात आजही आपले राज्य स्वयंपूर्ण नाही. राज्यात या विभागासाठी अनेक वर्षांपासून केवळ 140 कोटींची तरतूद होती.

त्यातील शंभर कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटीच खर्च होत होते. आता ही तरतूद 650 कोटींपर्यंत नेली आहे. केंद्राने एक हजार कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. पुढील वर्षी राज्याचे स्थान देशात आघाडीवर नेण्याचा मानस आहे.'' जानकर यांचे भाषण सुरू असतानाच काही शेतकऱ्यांनी दुधातील भेसळीबाबत प्रश्‍न उपस्थित केले; मात्र जानकर यांनी भाषणात त्याचा उल्लेखही केला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी नंतर नाराजी व्यक्त केली.