सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नगर - भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्यांचा खून केला आहे. सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. राज्यातील दीडशे माणसांचा यामुळे बळी गेला. त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करून हे सरकार लुटारूंचे आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्यात केली.

नगर - भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्यांचा खून केला आहे. सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. राज्यातील दीडशे माणसांचा यामुळे बळी गेला. त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करून हे सरकार लुटारूंचे आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्यात केली.

राज्यभर सुरू होणाऱ्या जनआक्रोश मेळाव्याची सुरवात मंगळवारी नगरपासून झाली. आज झालेल्या कार्यक्रमात कॉंग्रेस नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या वेळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, खासदार हुसेन दलवाई, आमदार निर्मला गावित, बाळासाहेब थोरात आदींनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व जनआक्रोश मेळाव्याचे समन्वयक विनायक देशमुख यांनी मेळाव्याचा उद्देश विशद केला.

चव्हाण म्हणाले, 'आठ नोव्हेंबरला नोटाबंदी होऊन एक वर्ष पूर्ण हो आले झाले. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व स्तरांत पिळवणूक सुरू झाली. व्यापारी देशोधडीला लागले. शेतकऱ्यांचे हाल पाहवत नाहीत. त्यामुळे हा दिवस "काळा दिवस' म्हणून पाळला जाईल. सोशल मीडियावरील बंधणे, तरुणांचा आवाज दाबण्याचा सरकारकडून सुरू असलेला प्रयत्न, वृत्तपत्रांवरील दबाव आदी विषयांवर चव्हाण यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ""मोदी म्हणतात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता तुम्ही म्हणा बाय बाय', अशी घोषणा चव्हाण यांनी करताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. महागाई, बेरोजगारी, कर्जमाफी, जीएसटी, नोटबंदी, शेतीमालाचा भाव आदी विषयांवर नेत्यांनी भाषणातून समाचार घेतला.

विदेशांच्या इशाऱ्यावर नाचणारे सरकार - मोहन प्रकाश
रात्री आठ वाजता नोटाबंदी करून पंतप्रधान थेट अमेरिकेला गेले. तेथे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कानात जाऊन सांगताहेत, "आम्ही नोटाबंदी केली.' रात्री बारा वाजता "जीएसटी' लागू केला आणि पंतप्रधान गेले जपानला. तेथील नेत्यांना आपला पराक्रम सांगितला. हे सरकार विदेशांच्या इशाऱ्यावर नाचणारे आहे. मोदी यांनी चहा विकला, आता ते देश विकायला निघालेत. त्यामुळे सरकारवर हल्लाबोल करावा लागेल, असे म्हणत मोहन प्रकाश यांनी सरकारवर टीका केली.

"वाघां'चे दात पाडलेले
शिवसेनेवर संधान साधून आधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीकेची राजकीय फलंदाजी केली. 'उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शेळ्या वाटल्या. त्या शेळ्या गेल्या "मातोश्री'वर चरायला. आमचे वाघ मुंबईत फिरतात, असे ते म्हणतात; पण या वाघांचे दात पाडलेले आहेत. अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे,'' असे विखे यांनी म्हणताच हशा पिकला. तोच धागा पकडून अशोक चव्हाण यांनी "तिकडे सत्तेत राहतात आणि बाहेर सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. नेमके काय करायचं, हे शिवसेनेलाच कळत नाही,' असा टोला शिवसेनेला मारला.