किरण बेरड यांच्या लघुपटाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सनी सोनावळे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नगरः भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेमध्ये नगरमधील 'अवघड काय?' या लघुपटाची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झालेली आहे.

नगरः भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेमध्ये नगरमधील 'अवघड काय?' या लघुपटाची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झालेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी'  अंतर्गत भारताला स्वच्छ बनविण्यात माझे योगदान या विषयावर लघुपट मागवले गेले होते. ही स्पर्धा अठरा वर्षाखालील गट आणि अठरावर्षापुढील गट अशा दोन गटात झाली. यासाठी वेळमर्यादा 2 ते 3 मिनिट दिली गेली होती. अगोदर ही स्पर्धा जिल्हास्तरीय घेण्यात आली. त्यामध्ये किरण बेरड लिखित अवघड काय? या लघुपटाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली. हा लघुपट किरण बेरड आणि दीपक देशमुख या दोन तरुणांनी दिग्दर्शित केलेला आहे. तर याचे कॅमेरामन दीपक देशमुख आणि अशोक भोंगळ आहेत. प्रमुख भूमिकेत नगरचे नाना मोरे, राणी कासलीवाल आणि रसिका यादवाडकार आहेत.

अहमदनगरच्या पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेने (वासो) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा लघुपट पुढे पाठविला होता. तेथेही या अवघड काय ने दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली. आता हा लघुपट राष्ट्रीय पातळीवर गेला असून, तेथे संपूर्ण भारतातून निवडलेले लघुपट स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. या लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक किरण बेरड असून, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असून ते 'सकाळ' 'तडका'कार आणि बातमीदार ही आहेत. त्यांचे आगामी चित्रपट इपितर आणि टार्गेट हे पुढील चार महिन्यांत प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी नगरच्या कलाकारांना ही संधी दिलेली आहे.