कोपर्डी खटल्याची सुनावणी आता 17 ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्यात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्यासह पाच जणांच्या साक्षी तपासण्याचा आरोपी संतोष भवाळ याच्या वकिलांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काल (ता. 3) फेटाळला. आरोपीच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. त्यामुळे आजची सुनावणी आता 17 ऑगस्टला होणार आहे. औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिलेल्या, "यशदा'चे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण यांची साक्षही त्याच दिवशी होईल. न्यायालयात हजर राहण्याबाबतचे समन्स चव्हाण यांना पाठविले.

कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. आरोपी भवाळ याच्यातर्फे ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जिल्हाधिकारी, वैद्यकीय प्रयोगशाळा संचालक, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे सहायक संचालक, माध्यमांचे प्रतिनिधी; तसेच सीडी तयार करणाऱ्या व्यक्तींच्या साक्षीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, खटल्याशी संबंध नसल्याने येथील न्यायालयात तो फेटाळला.