छेडछाडीनंतर पोलिसात तक्रार का केली नाही?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नगर - कोपर्डी येथील अत्याचार व खून खटल्यातील आरोपींनी घटनेच्या तीन-चार दिवस आधी छेडछाड केली होती, मग त्याबाबत तक्रार का दिली नाही? असा प्रश्‍न आरोपी जितेंद्र शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी आज युक्तिवादात उपस्थित केला. आरोपीचे कपडे जप्त करणे, पंचनामा व अन्य बाबींवरही त्यांनी आक्षेप नोंदविला. सरकार पक्षाने दाखल केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावाही त्यांनी केला.

या खटल्यात आरोपी जितेंद्र शिंदे याच्यातर्फे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. आज (रविवारी) सुटी असूनही खटल्याचे कामकाज सुरू होते. मकासरे म्हणाले, 'कोपर्डीत एकाच आडनावाचे आणि एकमेकांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे गावात वजन आहे. जर पीडितेची घटनेआधी तीन-चार दिवस छेड काढली होती, तर मग पोलिसात तक्रार का दिली नाही? शाळेतील मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांनी तपासात सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार मदत केली; मात्र पीडित मुलीने खो-खोच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नाही. मुलगी शाळेत हजर होती; मात्र ते लपविण्यासाठी हजेरीपत्रक बदलले. तिच्या मैत्रिणींनी दिलेले जबाब व साक्ष यात तफावत आहे. त्यांना वर्गात किती मुले-मुली आहेत, स्कूलबसमधून कोण कोणत्या ठिकाणी उतरते, हे त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे त्या तिच्या मैत्रिणी नाहीत, त्या तिच्यासोबत शाळेत जात नव्हत्या, हेही स्पष्ट झाले आहे. सरकार पक्षाने ठरवून जबाब घेतला व आरोपी संतोष भवाळ, नितीन भैलुमेचा सहभाग कसा आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.''