डांबरी रस्ते नव्हे, साक्षात 'मृत्यूपथ' !

हरिभाऊ दिघे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

अवजड वाहतूक कारणीभूत !
डांबरी रस्ता व्यवस्थित नसताना नगर - मनमाड या डांबरी रस्त्यावरील शिर्डीमार्गेची अवजड वाहतूक झगडेफाटा व तळेगाव दिघे मार्गे वळविण्यात आलेली आहे. त्यामुळे संगमनेर ते कोपरगाव व तळेगाव ते लोणी रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. रस्त्यांच्या प्रचंड दुर्दशेत भर घालण्यात अवजड वाहतूक कारणीभूत ठरत आहे.

तळेगाव दिघे (जि. नगर ): संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुली मार्गे जाणाऱ्या संगमनेर ते कोपरगाव तसेच लोणी ते नांदूरशिंगोटे या डांबरी रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. खड्डेमय बनलेले रस्ते अपघातास कारणीभूत व जीवघेणे ठरत आहेत. दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष सुरु असल्याने रस्ता दुर्दशेचे दशावतार सुरु आहे. खड्डेमय डांबरी रस्ते साक्षात 'मृत्यूपथ' बनले आहेत.

संगमनेर ते कोपरगाव दरम्यान असलेला झगडेफाटा ते वडगावपान फाटा हा डांबरी रस्ता 'बीओटी' तत्वावर खाजगीकरणातून करण्यात आलेला होता. सध्या या रस्त्यावरील पथकर वसुली बंद आहे. सदर रस्ता आता संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्याचे काम मुळातच सुमार दर्जाचे झालेले असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. भीज पावसाने सध्या या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली. लोणी ते नांदूरशिंगोटे या डांबरी रस्त्याचीही पावसाने अनेक ठिकाणी वाट लावली आहे. डांबरी रस्त्यावरील खड्यात पाणी साचल्याने रस्ते अधिक प्रमाणात उखडतात. खड्डेमय रस्ते मृत्यूघंटा बनले असून अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. तळेगाव चौफुली परिसरातही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या दुर्दशाप्राप्त डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सुरु आहे. खड्डेमय डांबरी रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारक प्रवाशांची हाडे खिळखिळी होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने 'मृत्यूपथ' बनलेल्या खड्डेमय डांबरी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी संतप्त प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.
 
अवजड वाहतूक कारणीभूत !
डांबरी रस्ता व्यवस्थित नसताना नगर - मनमाड या डांबरी रस्त्यावरील शिर्डीमार्गेची अवजड वाहतूक झगडेफाटा व तळेगाव दिघे मार्गे वळविण्यात आलेली आहे. त्यामुळे संगमनेर ते कोपरगाव व तळेगाव ते लोणी रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. रस्त्यांच्या प्रचंड दुर्दशेत भर घालण्यात अवजड वाहतूक कारणीभूत ठरत आहे.

Web Title: Nagar raod road condition in talgaon