माणुसकीच्या भिंतीवर गरिबीची थट्टा..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

‘पीडब्ल्यूडी’शेजारची स्थिती; ‘फेकू’ कपड्यांचे किसळवाणे दृश्‍य

सातारा - ‘नको असेल ते द्या... हवे असेल ते घेऊन जा...’ या संकल्पनेतून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीवर शिवस्वराज्य प्रतिष्ठानने ‘माणुसकीची भिंत’ उभी केली. मात्र, नको ते ‘फेकू’ कपडे तेथे टाकले जाण्याबरोबर, घरातील कचराच जणू तेथे आणून टाकला जात असल्याने, गरिबीची थट्टाच तेथे होत आहे. 

‘माणुसकीची भिंती’चा उपक्रम विविध ठिकाणी राबविला गेला आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्याचे लोण सातारा शहरातही पसरले. प्रथमत: त्याला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानने पोवई नाका येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीला ‘माणुसकीची’ छटा देण्याचा प्रयत्न केला. रंगकाम करून, तेथे बालक, महिला, पुरुष यांचे जुने पण चांगले कपडे ठेवण्यासाठी रॅक बनविले. सुरवातीला काही दिवस येथे हा उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू झाला. काहींनी कपडे ठेवले, तर काही गरीब, गरजू ते कपडेही घेऊन जात होते. मात्र, या उपक्रमाकडे लक्ष देण्यासाठी तेथे कोणीच नसते. 

त्यामुळे काही विघ्नसंतोषी लोकांनी अत्यंत टाकाऊ कपडे तेथे टाकण्यास सुरवात केली आहे. मळकट, न वापरता येणारे कपडे तेथे पडून असतात.  
ते कोणी नेत नाही. काहीजण कपडे पाहण्यासाठी विस्कटत असतात. त्यामुळे तेच कपडे रस्त्यालगतच्या पदपथावर विखुरलेले असतात. ज्यांनी हा उपक्रम सुरू केला, त्यांनी योग्यरित्या त्याकडे लक्ष द्यावे; अन्यथा ‘पीडब्ल्यूडी’ने हे रॅक काढावेत, अशी मागणी होत आहे. 

‘झेडपी’च्या भिंतीवर कृतज्ञता
जिल्हा परिषद मैदानाजवळ हॅप्पी पीपल सामाजिक सेवाभावी संस्था, वात्सल्य फाउंडेशन तसेच इतर काही संस्था, संघटनांतर्फे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम दर मंगळवारी चालविला जातो. त्यात काही स्वयंसेवक स्वत: तेथे हजर राहून कामकाज करतात. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने तेथे सुरू आहे.

Web Title: nako asel te dya have asel the gheun ja