‘राष्ट्रवादी’चा पराभव ‘राष्ट्रवादी’कडूनच!

- प्रशांत गुजर
बुधवार, 1 मार्च 2017

जयश्री गिरी यांचा विजय हा पक्षश्रेष्ठींना आत्मचिंतन करावयास लावणारा 

सायगाव - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जावळीत प्रतिष्ठेच्या झालेल्या कुडाळ गटामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋषिकांत शिंदे यांचा पराभव, सायगाव गणामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री गिरी यांचा निसटता विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेष्ठींना आत्मचिंतन करावयास लावणारा आहे. गटातील पराभवाचे विश्‍लेषण हे एका वाक्‍यात करावयाचे झाल्यास ‘राष्ट्रवादी’चा पराभव ‘राष्ट्रवादी’नेच केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

जयश्री गिरी यांचा विजय हा पक्षश्रेष्ठींना आत्मचिंतन करावयास लावणारा 

सायगाव - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जावळीत प्रतिष्ठेच्या झालेल्या कुडाळ गटामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋषिकांत शिंदे यांचा पराभव, सायगाव गणामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री गिरी यांचा निसटता विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेष्ठींना आत्मचिंतन करावयास लावणारा आहे. गटातील पराभवाचे विश्‍लेषण हे एका वाक्‍यात करावयाचे झाल्यास ‘राष्ट्रवादी’चा पराभव ‘राष्ट्रवादी’नेच केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कुडाळ गटामध्ये ‘राष्ट्रवादी’चे मातब्बर, ज्यांच्यावर पक्षाचा भारी विश्वास असणारी नेत्यांची फळी आहे. तरीही गेल्या दोन निवडणुकांमध्ये अशाच नेत्यांच्या गद्दारीमुळे पक्षाच्या बालेकिल्ल्यात पराभव पत्करावा लागला आहे, असे सर्वसामान्य कार्यकर्ते आपापसात आज स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत. गेल्यावेळी सौरभ शिंदे यांचा पराभव हा पक्षातीलच नेत्यांनी केलेला होता. यावेळीही त्यांची ‘व्यूव्हरचना’ चांगली होती. मात्र, ऐनवेळी त्यांना भाजपच्या संजय शिंदे यांच्या विरोधामध्ये गणात उतरवून, गटात भाजपच्या दीपक पवार यांच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली गेली. सायगाव गणामध्ये साधना कदम यांच्यासमोर सुहास गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी यांना उमेदवारी देण्यात आली.

गेल्या वेळी झालेला पराभव पाहता सौरभ शिंदे यांनी आपली बांधलेली मोट घट्ट करून विजय मिळवला. सायगाव गणामध्ये आरक्षणाचा मुद्दा असूनही जयश्री गिरी यांना निसटता विजय मिळाला. या ठिकाणी ‘राष्ट्रवादी’च्याच नेत्यांनी उभे केलेले ‘मराठा कार्ड’ जनतेने नाकारून जयश्री गिरी यांना निवडून दिले. दोन्ही गणांतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी चांगले प्रयत्न होतात. त्यामध्ये यशही मिळते. मग, या विभागामध्ये असणाऱ्या नेतेमंडळींनी गटात नेमके काय केले? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. गटामध्ये पक्षाची महत्त्वाची पदे असणारे नेते असूनही पक्षाची पीछेहाट का होते? त्यांनी प्रामाणिक काम केले असते तर गटातील विजय हा ‘राष्ट्रवादी’चा झाला असता. मग नेमके काय झाले? याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

दरवेळी पराभवाचे खापर हे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर फोडले जाते. गटातील पराभव पाहता आता अशा नेत्यांवर विश्वास ठेवून निवडणुका लढवणे मोठे धोक्‍याचे ठरणार आहे. त्यात दरवेळी ‘राष्ट्रवादी’चा पराभव हा ‘राष्ट्रवादी’च करताना दिसत असतानाही पक्षश्रेष्ठी ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. आमदार शशिकांत शिंदे हे मात्र, निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीला विसरून पूर्वी त्यांना त्रास देणाऱ्या विरोधकांना बरोबर घेवून काम करत असल्याने त्याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी ‘टुकारां’पासून सावध राहावे
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आता आनेवाडी, सायगाव, मोरघर, भणंग येथील ‘टुकार’ कार्यकर्त्यांपासून सावध राहून आतापासूनच कामाला लागले पाहिजे; अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम भोगावा लागेल. पक्षामधील घरभेदींना त्वरित घराबाहेर काढून निष्ठेने काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना संधी देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: ncp loss by ncp