राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "घड्याळा'चा गजर! 

गजानन गिरी - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 मार्च 2017

मसूर - जिल्हा परिषदेच्या मसूर गटासह मसूर व वडोली भिकेश्‍वर गणांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचा गजर खणखणला. निवडणुकीत "राष्ट्रवादी'त छुपी, अंतर्गत नाराजी असल्याचा फुगाही फुटला. मत विभागणी "राष्ट्रवादी'च्या पथ्यावर पडली. कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव जगदाळे यांचे कौशल्यही कामी आले. या निवडणुकीत जुन्या राजकीय समीकरणाला छेद मिळाला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्यच राहिला. 

मसूर - जिल्हा परिषदेच्या मसूर गटासह मसूर व वडोली भिकेश्‍वर गणांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचा गजर खणखणला. निवडणुकीत "राष्ट्रवादी'त छुपी, अंतर्गत नाराजी असल्याचा फुगाही फुटला. मत विभागणी "राष्ट्रवादी'च्या पथ्यावर पडली. कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव जगदाळे यांचे कौशल्यही कामी आले. या निवडणुकीत जुन्या राजकीय समीकरणाला छेद मिळाला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्यच राहिला. 

जिल्हा परिषदेचा मसूर गट खुला झाल्याने निवडणुकीत रथी महारथींचा सहभाग, प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला या पार्श्‍वभूमीवर लढत लक्षवेधी व चर्चेची ठरली. कडवे आव्हान देण्यासाठी व्यूहरचना, त्यात गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर अंतर्गत नाराजी, कॉंग्रेस अंतर्गत गटबाजी अशी किनारही लाभली होती. मात्र, त्याला छेद मिळाला अन्‌ राष्ट्रवादीने बाजी मारली. मोठ्या फरकाने लढत जिंकली. मसूर व वडोली भिकेश्‍वर गणांत कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागले. दोन्ही गणांत अपक्ष, बंडखोर उमेदवार हे कॉंग्रेसचेच होते. या अपक्षांची मतांची आकडेवारी पाहता कॉंग्रेसला ते मारक ठरले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा, भेटीगाठी कामी आल्या नाहीत. याउलट "राष्ट्रवादी'तील गटातील नाराजी पडद्याआड करण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. त्यात ते सफाईदारपणे यशस्वी झाले. इच्छुक नाराज उमेदवारांची बंडखोरी रोखली. 

या लढतीत माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीने अस्तित्वासाठी लढत दिली. गट राखण्याचा प्रयत्न केला. उंडाळकर यांनी सभांना फाटा दिला. प्रचारासाठी फिरकलेही नाहीत. प्रचाराचे काम त्यांच्या शिलेदारांनीच खांद्यावर घेतले होते. महानंदा दूध डेअरीचे संचालक वसंतराव जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. भाजप- शिवसेनेची मात्रा काहीच चालली नाही. मसूर गणात कॉंग्रेसची उमेदवारी न मिळालेल्या अपक्ष उमेदवार सुनीता दळवी व वडोली गणाचे अपक्ष उमेदवार डॉ. शंकरराव पवार यांनी अपेक्षेनुसार चांगली मते घेतल्याने कॉंग्रेसला फटका बसला. त्यात गटात व गणातही सहा उमेदवार राहिल्याने मतविभागणी "राष्ट्रवादी'च्याच पथ्यावर पडली. गटात मानसिंगराव जगदाळे, गणात शालन माळी, वडोली गणात रमेश चव्हाण यांनी बाजी मारली. मसूर गटात नव्या राजकारणाची समीकरणे जुळली नाहीत. राष्ट्रवादी भक्कम राहिली. 

 

जगदाळे, शालन माळींना पद मिळणार? 
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने मानसिंगराव जगदाळे या पदासाठी कऱ्हाड तालुक्‍यातून दावेदार ठरू शकतात. पक्षपातळीवरचा निर्णय काय राहणार, बऱ्याच कालावधीनंतर कऱ्हाड तालुक्‍याला न्याय मिळणार का, तर मसूर गणांच्या शालन माळी पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या दावेदार आहेत. ओबीसी महिला आरक्षणानुसार त्या सभापतिपदाच्या खुर्चीवर बसू शकतात. मात्र, नजीकच्या काळात राजकीय जुळणी व घडामोडीनुसारच त्याचा प्रत्यय अनुभवयास मिळणार आहे.