मेंदूच्या आजाराने त्रस्त ऐश्‍वर्याला हवी आहे मदत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

न्यू कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात ती शिकते. ऐश्‍वर्याच्या घरची स्थिती हलाखीची आहे. तिची आई कापड दुकानात काम करते. रुग्णालयातील बिल सुमारे दोन लाखांच्या घरात जाईल, असा निकटवर्तींयाचा अंदाज आहे.

कोल्हापूर - मेंदूच्या आजाराने त्रस्त ऐश्‍वर्या संजय साळोखे हिला मदतीसाठी समाजातून दानशूर हातांची गरज आहे. शिवाजी पेठेतील फिरंगाई तालमीजवळ (इंगवले गल्ली) येथे राहणाऱ्या ऐश्‍वर्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

न्यू कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात ती शिकते. ऐश्‍वर्याच्या घरची स्थिती हलाखीची आहे. तिची आई कापड दुकानात काम करते. रुग्णालयातील बिल सुमारे दोन लाखांच्या घरात जाईल, असा निकटवर्तींयाचा अंदाज आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्तरावर आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उपचाराचा खर्च अधिक असल्याने तिच्या कुटुंबीयाला परवडणारा नाही. 

एकतर भाड्याचे घर त्यात आईला महिन्याचा पगार पाच हजार रुपये अशा स्थितीत कुटुंब अडचणीत आले आहे. स्थानिक कार्यकर्ते त्यांना शक्‍य आहे तेवढी मदत करत आहेत. न्यू कॉलेजचा देदिप्यमान पंरंपरा आहे. माजी विद्यार्थी संघाने विविध उपक्रम राबवून सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे. रविवारी (ता. 12) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होत आहे. याच महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी उपचार घेत असताना मदतीला माजी विद्यार्थी निश्‍चितपणे येतील, असा विश्‍वास तिचा कुटुंबीयांना वाटतो. 

हातावरचे पोट असलेल्या साळोखे कुटुंबीयांचा गाडा ऐश्‍वर्याच्या आई मनीषा साळोखे या चालवतात. मुलगा आदित्य हा महाराष्ट्र हायस्कूललमध्ये शिकतो. उपचाराचा खर्च दोन लाखापर्यत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. ऐश्‍वर्याला अचानक चक्कर आली आणि त्यातून मेंदूला ईजा झाल्याचे स्पष्ट झाले. शाहूपुरीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.