लाख लिटर पाण्याची हमीवर कुटुंब जगेल! 

News venture For Lack of Water by Ugam Foundation
News venture For Lack of Water by Ugam Foundation

सांगली - कुटुंबाला वर्षाला एक लाख लिटर पाण्याची शाश्‍वती दिली तर चार माणसांचे कुटुंब सक्षमपणे जगू शकते असे प्राथमिक निष्कर्ष आटपाडी तालुक्‍यातील हिवतड येथील आठ कुटुंबाच्या पथदर्शी प्रकल्पातून पुढे आले आहेत. आता हेच निष्कर्ष अधिक शास्त्रशुध्दरित्या समाजासमोर आणण्यासाठी उगम फाऊंडेशनने जांभूळणी व परिसरातील गावांमध्ये आणखी पन्नास कुटुंबासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक टीमच्या सहकार्याने 'दारिद्रयाविरोधात लढा' नावाने हा प्रकल्प राबविण्याचा निर्धार केला आहे. ज्यात अल्पभुधारक दुष्काळी कोरडवाहू शेतीसाठीची पीकपध्दती, कुटुंबापुरता भाजीपाला उत्पादन, पुरक दुग्धोत्पादन व्यवसाय अशा विविध अंगाने विचार करून येणारे निष्कर्ष शासनापुढे मांडले जातील. या प्रकल्पासाठी वस्तू किंवा अन्य कोणत्याही स्वरुपात मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी केले आहे. 

दुष्काळी भागात सिंचन योजना झाल्या तरी हे पाणी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आजही मोठे दिव्य आहे. ओढ्या नाल्यांमध्ये योजनांचे पाणी वाहते आहे मात्र गरजूंना मात्र ते पाणी म्हणजे आजही दिवास्वप्न आहे. कारण शासनाकडे वितरणाची व्यवस्था नाही. या पाण्याचा वापर सक्षम असणारेच घेत असून योजनांच्या पाणी स्त्रोतापासून दूर असणारे शेतकरी आजही कोरडवाहूच आहेत. दुसरीकडे या पाण्याची बाजारातील उत्पादनमुल्य वाढवणारे योग्य मार्गदर्शन नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील गरीब कुटुंबाचे रोजगारासाठीचे शहरांकडील स्थलांतर आजही थांबलले नाही. या पार्श्‍वभूमीवर गेल्या चाळीस वर्षापासून दुष्काळी भागातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी पर्याय देणारी आंदोलने आणि उपक्रम उभे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी सातत्याने नवे प्रयोग करीत उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 

श्री पवार यांनी हिवतड येथे गेली तीन वर्षे पथदर्शी प्रकल्प सांगलीतील आभाळमाया फाऊंडेशनच्या सहकार्याने राबवला होता. त्यात प्रत्येक कुटुंबाला डाळिंबाची दोनशे रोपे व पाणी व्यवस्थापन सामुग्री (पाईल लाईन, टाक्‍या) पुरवल्या. प्रत्येक रोपाला मोजून पाणी द्यायचे आणि त्याच्या नोंदी ठेवल्या. त्यानुसार एक एकरासाठी वर्षाला 85 हजार लिटर पाणी लागले. त्यातून डाळिंबे बाजारपेठेत पोहचली. आता हेच आता अधिक नेमकेपणाने अर्थशास्त्राच्या कसोट्यांच्या आधारे सिध्द करून शासनापुढे मांडले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील संशोधकाच्या टीमची मदत घेतली जाणार आहे. 

याबाबत श्री पवार म्हणाले, 'या प्रयोगासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी पंधराशे शुल्क आकारून आठ कुटुंबाची निवड केली जाईल. त्यांना रोपे, पाणी, खते आणि मार्गदर्शन अशा सुविधा दिल्या जातील. किमान पन्नास शेतकऱ्यांचा असा गट करता येईल. पाच गुंठे क्षेत्रात चारा निर्मिती आणि त्यातून 2 जनावरांना टंचाईच्या काळातील 120 दिवसात दररोज 30 किलोप्रमाणे 2 जनावरांना किमान 3 ते 4 टन चारा तयार होईल. अशी चाऱ्याची शाश्‍वत व्यवस्था उभी केली जाईल. पाऊस जेव्हा लांबतो तेव्हा स्प्रिंकलर वॉटर गन वापरून फायर फायटरच्या सहाय्याने पीक वाचवता येईल. दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबासाठी संरक्षित अशी पाणी यंत्रणा उभी करणे, भौगोलिक परिस्थितीनुसार पर्यावरणपुरक पीक पध्दती विकसित करणे यासाठीचे हे मॉडेल आहे. त्यातून या शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत पाणी व्यवस्था उभी करण्यासाठी अनेक लोक स्वतःहून लोक पुढे येऊ शकतील. शेतकऱ्याला पाण्याची खात्री दिली तर त्याला सरकारी मदतीच्या कुबड्यांची गरज लागणार नाही. मात्र त्याआधी त्याला उभे करण्यासाठी मदतीची गरज आहे. त्याचे सूत्र कोणते असावे हे या पथदर्शी प्रकल्पातून पुढे येईल.' 

समाजाने पुढे यावे 
निसर्गाची कार्यपध्दती विचारात न घेता केलेल्या उपाययोजना आजवर अपयशीच ठरल्या. दुष्काळी भागात ऊस लागवडीला दिले जाणारे प्रोत्साहन घातक आहे. शेतकऱ्याला कायम याचक न बनवता त्याला स्वक्षमतेवर जगण्यासाठी तयार करणे हा या पथदर्शी प्रकल्पाचा हेतू आहे. एकूण पन्नास कुटुंबांसाठी 56 लाख 43 हजार 410 रुपयांचा तीन वर्षासाठीचा खर्च असून पहिला टप्प्यात आठ शेतकऱ्यांसाठी दहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे दारिद्रय कायमचे संपवण्यासाठीचे सूत्र निश्‍चित करणारा हा प्रयत्न असून त्यासाठी समाजाने मदतीचा हात द्यावा, असे मत बलवडी (भा.) येथील उगम फाऊंडेशनचे संस्थापक संपतराव पवार यांनी व्यक्त केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा. 
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com