पाच पोत्यांतून नेली नऊ कोटींची रोकड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

पोलिसांनी दोन टप्प्यांत मारला डल्ला; टीप्सरसह दोन साथीदार ताब्यात

पोलिसांनी दोन टप्प्यांत मारला डल्ला; टीप्सरसह दोन साथीदार ताब्यात
कोल्हापूर - वारणानगर (ता. पन्हाळा) शिक्षक कॉलनीतील फ्लॅटमध्ये सांगलीतील त्या पोलिसांनी तपासाच्या नावाखाली दोन टप्प्यांत 9 कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारला. ती रक्कम पाच पोत्यांत भरून नेली असल्याचे तपासात पुढे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, टीप्सर गुंडासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत फ्लॅटमधील कोट्यवधी रकमेच्या चोरीप्रकरणी मोहिद्दीन मुल्ला याला सांगली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 3 कोटीहून अधिकची रक्कम जप्त केली. त्यानंतर त्या फ्लॅटमध्ये कोडोली पोलिसांना येथे एक कोटीहून अधिकची रक्कम मिळून आली होती. ती त्यांनी जप्त केली. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात 4 कोटी 46 लाख 79 हजार 862 रुपये चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. चोरीस गेलेल्या रकमेबाबत फिर्यादी झुंझार सरनोबत यांनी शंका व्यक्त केली. त्यांनतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गोपनीय तपास केला. त्यात सांगलीतील सात पोलिसांनी 9 कोटी 18 लाख रुपयावर डल्ला मारल्याचे पुढे आले. त्यानुसार सात पोलिसांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: nine crore cash in bag