कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सोलापूर - सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची भीक नको आहे, तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्याचबरोबर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी अनुकूल असल्याचेही खासदार शेट्टी यांनी सांगितले.

सोलापूर - सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची भीक नको आहे, तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्याचबरोबर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी अनुकूल असल्याचेही खासदार शेट्टी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार शेट्टी हे आपल्या कार्यकर्त्यांसह 22 ते 30 मे या कालावधीत पुणे ते मुंबई आत्मक्‍लेष यात्रा काढणार आहेत. त्यासंदर्भात माहिती देताना आयोजित पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा राजकारणात गुंतला आहे. यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या अडाणीपणाचा फायदा घेत त्यांच्यावर कर्ज लादले आहे. ज्याप्रमाणे उद्योगपतींची कर्जे माफ होतात, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी. त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. 22 ते 30 मे या कालावधीत होणारी आत्मक्‍लेष यात्रा ही शेतकऱ्यांप्रती व्यवस्था, समाज, सरकार यांनी दाखविलेली बेपर्वाही आहे.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र तसे करणे सरकारला शक्‍य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना करायचेच नव्हते तर त्यांनी आश्‍वासनच का दिले, असा प्रश्‍नही खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला. खासदार निधीतून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वजनकाटे बसविण्यास सुरवात केली आहे. त्या वजनकाट्यांवर उसाचे वजन करून तो कारखान्याला घालण्याचा प्रयोग माझ्या मतदारसंघात केला आहे. राज्यातील साखर कारखान्यांचे सगळे वजनकाटे ऑनलाइन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सदाभाऊंनी, नऊ दिवस चालायचे असेल तर यावे
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत या यात्रेत सहभागी होणार का? असे विचारले असता खासदार शेट्टी म्हणाले, की यात्रा नऊ दिवस चालणार आहे. नऊ दिवस चालायचे असेल तर त्यांनी यात्रेत सहभागी व्हावे. उगीच पाहुण्यासारखे येऊन चालणार नाही. संघटनेसाठी नऊ दिवस यावे लागेल; मात्र त्यांचा सध्याचा डामडौल पाहता ते यामध्ये सहभागी होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे.