देशात 30 वर्षांत दीड कोटी गर्भपात:डॉ.कांकरिया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

सोलापूर - देशात मागील 30 वर्षांत जवळपास दीड कोटी मुलींचा गर्भपात करण्यात आला आहे. हे देशावर आलेले मोठे संकट आहे. स्त्रीजन्माचा गर्भपात केल्याने आपली भारतीय संस्कृती कुठे गेली आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन "स्त्री जन्माचे स्वागत करा‘ या चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात "पोषण चळवळ, बेटी बचाओ, बेटी पढाओ‘ या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या वेळी डॉ. कांकरिया बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड म्हणाल्या, ‘देशात नवनवीन शोध लागले आहेत. त्या शोधांनी महिलांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. समाजाची स्त्रीबद्दलची मानसिकता बदलण्याची गरज आहे.‘‘ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे म्हणाले, ‘महिला व बालविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका म्हणून काम करताना आपण कमी पडत आहोत का, याचा विचार व्हायला हवा. महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाने याबाबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.‘‘

‘त्या‘ मुलींच्या नावे 11 हजारांची ठेव
बोराळे (ता. मंगळवेढा) येथील पतीने आपल्या पत्नीला पाच मुली झाल्यामुळे तिचा जीव घेतला होता. त्यातील दोन मुलींच्या नावे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी प्रत्येकी 11 हजार रुपयांची ठेव बॅंकेत ठेवली आहे. त्याचे प्रमाणपत्र त्या मुलींना देण्यात आले.