जयंत पाटील यांच्या विरोधात इस्लामपुरात विरोधकांची वज्रमूठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

इस्लामपूर - आगामी नगरपालिका निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात आज विरोधकांनी एकीची वज्रमूठ केली. खासदार राजू शेट्‌टींच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करण्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र आघाडी करायची की पक्षाच्या चिन्हावर ताकद आजमावायची याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलून येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे. दरम्यान, विरोधी गटाचे नगराध्यक्षपदाचे "त्रांगडे‘ कसे मिटणार, हाच खरा प्रश्‍न आहे. 

पालिका निवडणुकीसाठी शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात सर्वपक्षीय घटकांची खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत हॉटेल रमाडा येथे आज दुसरी बैठक झाली. भाजपचे विक्रम पाटील, कॉंग्रेसचे वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार, शकील सय्यद, महाडिक युवा शक्तीचे कपिल ओसवाल, सतीश महाडिक, स्वाभिमानीचे आप्पासाहेब पाटील, मनसेचे सनी खराडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. थेट नगराध्यक्षपदासाठी विक्रम पाटील, आनंदराव पवार व वैभव पवार हे तिघेही इच्छुक आहेत. 

राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी करणे यावर सर्वांचे एकमत झाले. मात्र उद्या सांगली येथे कॉंग्रेसची तर मुंबई येथे शिवसेना व भाजप पक्षाच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. यात इस्लामपूरबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यायची या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा होईल. दरम्यान, आजच्या बैठकीत कोणत्या गटाच्या किती जागांच्या मागण्या आहेत व निवडणुकीत कोणती रणनीती आखावी लागेल या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. 

विरोधी आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. संबंधित पक्षांच्या प्रमुखांशी मुंबईत भेट घेऊन मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून आघाडी करून लढण्यास तत्त्वतः मान्यता मिळाली असून पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसात आघाडी घोषित करू. आघाडी निश्‍चित झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढू. 
- खासदार राजू शेट्टी