कृषी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले

अभय जोशी
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पंढरपूर ः ठेकेदाराकडून काम पूर्णत्वाचा दाखला व अनामत रक्कम परत देण्यासाठी एक लाख रुपये लाच घेताना दोन कृषी अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोन्ही अधिकारी सांगोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील आहेत. ही कारवाई आज (शुक्रवार) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून समजलेली माहिती अशी की, जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मातीनाला बांध व कंपार्टमेंट बंडींगची कामे केलेल्या ठेकेदाराला काम पूर्णत्वाचा दाखला व अनामत रक्कम परत देण्यासाठी सांगोला येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक सुरेंद्रकुमार श्रीरंग शिंदे, (वय 54, रा. सुपणे ता. कराड), सांगोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक दिलीप दत्तात्रय पंचवाडकर (वय 55, रा.हरिदास वेस, पंढरपूर) यांनी चार लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे या विषयी तक्रार केली होती. त्यावरुन आज लाचलुचपत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारकड, श्री.साळुंखे यांच्या पथकाने पंढरपूर येथे सापळा लावला होता. लाचेची मागणी केलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये तक्रारदाराकडून स्विकारत असताना आरोपी शिंदे व पंचवाडकर यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने येथील स्टेशन रस्त्यावरील भाई राऊळ पुतळ्याजवळ रंगेहात पकडले. या प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून दोन्ही आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे.