'कॅनडा'ऊ विठ्ठलू...

अभय जोशी
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पंढरपूरला प्राचीन परंपरा आहे. वारकरी सांप्रदायाच्या या भक्तीपाठीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकरी येतात. भारत-कॅनडा मैत्री संबंधातून पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाकडून अल्पव्याजदराने दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेत महत्वाची भूमिका असलेल्या रिव्हज्‌ यांनी आज पंढरपूरला भेट दिली.

पंढरपूर : नमामि चंद्रभागा योजनेच्या घोषणेनंतर पंढरपूरला "हायटेक स्पिरिच्युअल सिटी" करण्याचा संकल्प आज कॅनडाच्या कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज्‌ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नदीघाटाची पाहणी केल्यानंतर रिव्हज्‌ यांनी कॅनडामधील प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पंढरपूरचा स्मार्ट तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यात येईल असे जाहीर केले. पंढरपूरातील स्वागताने रिव्हज्‌ भारावून गेले.

भारत-कॅनडा मैत्री संबंधातून पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाकडून अल्पव्याजदराने दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेत महत्वाची भूमिका असलेल्या रिव्हज्‌ यांनी आज पंढरपूरला भेट दिली. संत तुकाराम भवन मध्ये मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार झाला.

याप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार प्रशांत परिचारक, आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, एमडीसी कंपनीचे संचालक पुष्कर टापरे, प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

रिव्हज्‌ म्हणाले, पंढरपूरला प्राचीन परंपरा आहे. वारकरी सांप्रदायाच्या या भक्तीपाठीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकरी येतात. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही निश्‍चित मदत करु. विकास कामे ठरवून त्यासाठी आवश्‍यक निधी देण्याची योजना आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात काम करत आहे. परंतु असे जंगी स्वागत कुठे झाले नव्हते. आज पंढपुरातील लोकांचे प्रेम आणि आपुलकी पाहून भारावून गेलो.

पालकमंत्री देशमुख यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पंढरपूर विकासाचा ध्यास घेतला असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. 

डॉ. भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीच्या वेळी या योजनेचे सूतोवाच केले होते. जॉर्डन यांच्या दौऱ्यानंतर लि असोसिएटस्‌ कडून आराखडे तयार केले जातील. सर्वांशी चर्चा करुन आवश्‍यक बदल करुन कार्यवाही होणार आहे. राजकीय भूमिकेतून न पहाता पंढरपूरच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

आमदार भालके, आमदार परिचारक, नगराध्यक्षा सौ.भोसले यांनी पंढरपूरच्या विकासासाठी निधी मिळणार असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन सहकार्याचे आश्‍वासन दिले. मंदिर समितीच्या वतीने रिव्हज्‌ यांचा डॉ. भोसले यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौदागर मोळक, संजय वाईकर आदींनी संत तुकाराम महाराजांच्या प्रमाणे पांढरी पगडी घालून तर शिवसेनेच्या वतीने संदिप केंदळे, संभाजी शिंदे यांनी भगव्या रंगाचा फेटा बांधून सत्कार केला. राजेश धोकटे यांनी सूत्रसंचलन केले.

या कार्यक्रमापूर्वी श्री.रिव्हज यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. मंदिराची त्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. महाव्दार घाटापर्यंत ते चालत जाऊन श्री पुंडलिक मंदिर व वाळवंट परिसराची त्यांनी पाहणी केली. रिव्हज्‌ यांनी पंढरपूर अर्बन बॅंकेला सदिच्छा भेट दिली. आमदार व बॅंकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी त्यांचे स्वागत केले. पंढरपूरप्रमाणे श्री रुक्‍मिणीमातेचे जन्मस्थान अर्थात माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूरच्या विकासासाठी देखील पाचशे कोटी रुपयांचा निधी द्यावा, असे साकडे तेथील आमदार यशोमती ठाकूर यांनी या कार्यक्रमात जॉर्डन यांना घातले.