विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एसटी संपाचा फटका

अभय जोशी 
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सोमवारी रात्री बारा पासून संपामुळे शेकडो प्रवाशी येथील बस स्थानकावर एसटीच्या प्रतिक्षेत बसून होते. काल रात्री पासून एकही एसटी पंढरपूर आगारातून सोडण्यात आली नाही. परगावाहून देखील एकही एसटी स्थानकात आली नाही. दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबियांसह प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. विशेषतः महिला, लहान मुले आणि वृध्द प्रवासी संपामुळे वैतागलेले दिसत होते. 

पंढरपूर : एसटीच्या संपाचा फटका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना बसला. काल रात्री पासून शेकडो प्रवाशी येथील बस स्थानकावर अडकून पडले होते.दुसरीकडे एसटी संपाला संधी मानून खासगी वाहनचालकांनी आज सकाळ पासून येथील बस स्थानकावर एसटीच्या प्रतिक्षेत थांबलेल्या प्रवाशांची व भाविकांची अडवणूक सुरु केली. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे खासगी वाहन चालक प्रवाशांकडून दुप्पटीने भाडे आकारत अक्षरशः अडलेल्या प्रवाशांची लूट करताना दिसत होते. पंढरपूर आगारातील 450 कर्मचारी संपात सहभागी झाले असून सुमारे साठ हजार प्रवाशांची वाहतूक होणाऱ्या बस स्थानकावर शेकडो प्रवाशी अडकून पडले. 

सोमवारी रात्री बारा पासून संपामुळे शेकडो प्रवाशी येथील बस स्थानकावर एसटीच्या प्रतिक्षेत बसून होते. काल रात्री पासून एकही एसटी पंढरपूर आगारातून सोडण्यात आली नाही. परगावाहून देखील एकही एसटी स्थानकात आली नाही. दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबियांसह प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. विशेषतः महिला, लहान मुले आणि वृध्द प्रवासी संपामुळे वैतागलेले दिसत होते. 

एसटी संपाची संधी साधून खासगी वाहन चालकांनी मात्र प्रवाशांना दुपटीने भाडे सांगतिले जात होते. एरवी बस स्थानकाच्या समोरील बोळातून होणारी खासगी वाहतूक आज बस स्थानकाच्या बाहेरील बाजूस सुरु होती. पुण्याला जाण्यासाठी एसटी चे 238 रुपये तिकीट आहे आज पुण्याला जाण्यासाठी खासगी वाहनचालक साडेतीनशे ते चारशे रुपये मागत होते. सोलापूरला जाण्यासाठी एसटीचे 78 रुपये तिकीट आहे तिथे जाण्यासाठी खासगी वाहन चालक तब्बल 150 रुपये तर वेळापूर, सांगोल्यासाठी शंभर रुपये सांगितले जात होते. पर्यायी व्यवस्था नाईलाजास्तव प्रवाशांना तेव्हढे पैसे देणे भाग पडत होते. 

दरम्यान एसटी आगारातील चालक वाहकांनी एकत्र येऊन सरकार विरोधी घोषणा देत मागण्या मान्य होई पर्यंत संप चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. परगावाहून आलेल्या चालक वाहकांसाठी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी दालचा राईस ची सोय केली होती.