शेट्टी आणि मंत्री खोत यांच्यात दुरावाच!

धर्मवीर पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

इस्लामपूर - इस्लामपुरात रविवारी (ता. १२) विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांच्या आग्रहास्तव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले! एका व्यासपीठावर सुमारे तासभर बसून दोघांमध्ये एक ब्र शब्दही संवाद झाला नाही, उपस्थित जनतेने हे डोळ्यांनी पहिले. माध्यमांसमोर त्यांनी काहीही सांगितले असले तरी त्यांच्यात दुरावा आहे आणि मतभेदांची दरी रुंदावतच निघाली आहे हे सिद्धच झाले. व्यासपीठावरील नेत्यांनी मात्र भाषणांत दोघांच्या एकीचा सूर आळवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणुकीत स्थापन झालेल्या सर्वपक्षीय विकास आघाडीने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत त्यानिमित्ताने एका व्यासपीठावर आले होते. गेले काही दिवस त्यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

दोघांमधील अनेक घटना माध्यमांचा आणि तमाम जनतेतील चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यावर आज ते एकमेकांबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. कार्यक्रम सुरू झाल्यावर खासदार शेट्टी अर्धा तास उशिरा आले. तोपर्यंत मंत्री खोत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला होता. खासदार शेट्टी यांच्या आगमनानंतर सभागृहातील माहोल बदलला. दोघे एकमेकांच्या शेजारी बसले. पण एकमेकांशी बोलले नाहीत. 

मंत्रिमहोदयांनी भाषणात खासदार शेट्टी यांच्याशी ताणल्या गेलेल्या संबंधांबाबत चकार शब्द काढला नाही. उलट जुने काही संदर्भ देत नानासाहेब महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक यांच्याशी कसलेही वाद नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याआधी शेट्टीसाहेबांनी भाषणात जे मुद्दे मांडले त्यातील कोणत्याही मुद्द्याला त्यांनी समर्थनदेखील केले नाही. त्यांच्यातील संबंधाचे जे चित्र आज समाजात निर्माण झाले आहे त्याला त्यांनी माध्यमांनाच जबाबदार धरले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची त्यांनी सूचना केली.

सभेनंतर माध्यमांनी त्यांना जेव्हा गराडा घातला तेव्हा देखील आमच्यात वाद नाहीत हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न हे दोघे नेते करीत होते. 

जास्तच ताणल्यानंतर शेट्टींनी हात टेकले. म्हणाले, ‘‘अहो, आम्ही आता तुमच्या समाधानासाठी गळ्यात गळे घालू का?’’ असे म्हणत त्यांनी ते घातलेदेखील! मात्र यातून त्यांच्यातील दुरावा नष्ट झाला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. खासदार राजू शेट्टी यांनी सभा आणि वास्तव याचे भान राखत ‘मी रस्त्यावरची लढाई 

सांभाळत आहे आणि सदाभाऊंनी सरकारात राहून विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, आम्ही दोघे एका रथाची चाके आहोत, मी संघर्षाचे आणि भाऊ विकासाचे’ असे मुद्दे मांडले असले तरी येणारा काळच काय ते ठरवणार आहे. 

दोघेही पक्के राजकारणी
राजकारणात गेले की डोक्‍यात हवा शिरते, अशी साधारण चर्चा असते. खासदार शेट्टी आणि मंत्री खोत यांनाही हे विधान लागू झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव चळवळीतील कार्यकर्ते घेत आहेत. माध्यमांना वाटते म्हणून हातात हात आणि गळ्यात गळे घालण्यापेक्षा किमान समोरचे लोक पाहत आहेत म्हणून तरी व्यासपीठावर दोघांनी संवाद साधायला हवा होता, पण तसे झाले नाही. उलट नाते बिघडायला माध्यमेच कारण असल्याचे सांगून त्यांनी पक्‍क्‍या राजकारणी माणसासारखी लोकांची दिशाभूल केली आहे.

Web Title: Parting between Shetty and Minister Khot