मराठा मोर्चाचा सरकारकडून विपर्यास

मराठा मोर्चाचा सरकारकडून विपर्यास

सातारा - कोपर्डी घटनेचा निषेध आणि तरुणांतील खदखदीमधून मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. मराठा क्रांती मोर्चाबाबत सरकारने ठोस भूमिका घेण्याऐवजी त्याचा विपर्यास करण्याचा प्रकार सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याकडे सोपवून केंद्राने मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. 


"अच्छे दिन‘च्या नावाखाली लोकांची दिशाभूल सुरू असून पश्‍चिम महाराष्ट्रावर भाजप सरकार सातत्याने अन्याय करत आहे. उसाला चांगला दर देण्याची वेळ आली असताना हे सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे,‘ असेही त्यांनी स्पष्ट केले. 


पाटखळ (ता. सातारा) येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, कृषी सभापती सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमित कदम, किरण साबळे-पाटील, संजय देसाई, राहुल शिंदे, संतोष शिंदे, पोपट शिंदे, सरपंच नम्रता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


श्री. पवार म्हणाले, ""हे सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय होत आहे. बेरोजगारी असूनही रिक्त जागा भरल्या जात नाहीत. उसाला चांगला दर देण्याची वेळ आली असताना हे सरकार ऊस उत्पादक व कारखानदारांच्या मुळावर उठले आहे. निर्यात केलेल्या साखर पोत्यामागे हजार रुपये कर भरा, असे सांगत आहे. शेतकरी जगला तर कारखाने चालतील. कामगार, ऊस तोडणी व वाहतूकदार जगतील. आता तर सप्टेंबरअखेरपर्यंत 20 टक्केच साखर शिल्लक ठेवण्याचा दंडक काढला आहे. शेतकऱ्याला भाव देत नाही आणि जगूही देत नाही.‘‘ 


ते म्हणाले, ""कोपर्डीतील त्या मुलीने काय चूक केली होती? इतके दिवस मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. पुढेही निघणार; पण अजून हे सरकार त्यांना न्याय देऊ शकलेले नाही. ठोस भूमिका घेण्याऐवजी आंदोलनाचा विपर्यास करण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. इतक्‍या मोठ्या संख्येने मराठा समाज का बाहेर पडला आहे? येथील तरुणांच्या मनात खदखद आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केंद्र सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यावर ढकलून या समाजाच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सत्तेत आल्यावर एका वर्षात धनगर समाजाला आरक्षण देतो, असे त्यांनी सांगितले होते. आता म्हणतात त्यावर अभ्यास सुरू आहे.‘‘

सदाभाऊ, शेट्टी गप्प का..?
शेतकरी संघटनेचे लोक मंत्रिमंडळात आहेत. आता सदाभाऊ का आंदोलन करत नाहीत? राजू शेट्टी का मोदींना साखर निर्यातीसाठी सांगत नाहीत. आमचे सरकार होते त्यावेळी पवार साहेबांच्या बंगल्यासमोर आंदोलन करायचे. आता का आंदोलने होत नाहीत, असा प्रश्‍न श्री. पवार यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचे पश्‍चिम महाराष्ट्रात कधी दौरे झालेत का, असा प्रश्‍न करून ते म्हणाले, ""जी व्यक्ती वेगळा विदर्भ मागते, ती महाराष्ट्राला काय न्याय देणार? आता तर रामदेवबाबाला करोडो रुपयांची जमीन हमी भावात दिली आहे. हे त्यांचे "अच्छे दिन‘ आहेत का?‘‘ पालघर येथील कुपोषित बालक मृत्यू प्रकरणी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही पवार यांनी केली.
 

चिक्कीवर "पंकू‘ दिसते...
""हे सरकार घोटाळेबहाद्दरांचे असून, तूरडाळ, चिक्कीसारखे अनेक घोटाळे केले आहेत. लोणावळ्यात चिक्की घ्यायला थांबलो की चिक्कीच्या पाकिटावर मला "पंकू‘च दिसते,‘‘ असे श्री. पवार यांनी म्हणताच एकच हश्‍या पिकला. यावर त्यांनी "मी कोणाचे नाव घेतलेले नाही,‘‘ असा खुलासा मिश्‍किलपणे केला. व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झालेल्या टिकेचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. गैरसमज पसरविणाऱ्यांना लाज वाटायला हवी, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com