#PlasticBan प्लॅस्टिकविरोधी कारवाईस अधिकारी धजावेनात! 

#PlasticBan प्लॅस्टिकविरोधी कारवाईस अधिकारी धजावेनात! 

सातारा - गेल्या शनिवारपासून प्लॅस्टिक बंदीचा निर्णय अंमलात आला. सातारा- फलटण- कऱ्हाडमध्ये धडक कारवाई सुरू असताना जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका व नगपंचायतींमध्ये अद्याप कारवाईची पहिली पावतीही फाटली नसल्याचे आज कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी निदर्शनास आले. शनिवारपासून थेट कारवाईचे आदेश असतानाही "आपण नागरिकांच्या प्रबोधनावर भर दिला आहे,' अशी पळवाट संबंधित पदाधिकाऱ्यांनी काढली. प्लॅस्टिकचा भस्मासूर सजीवांच्या मुळावर उठला असताना काही अधिकारी- पदाधिकारी कोणालाही दुखवायचे नाही, अशाच भूमिकेत अद्याप असल्याचे स्पष्ट झाले. 

गेल्या शनिवारपासून प्लॅस्टिकबंदी अंमलात आली. चौथ्या शनिवारची सुटी असतानाही साताऱ्यात पालिका प्रशासनाने आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत ठेवून दिवसभरात आठ व्यावसायिकांवर कारवाई केली. आजअखेर सुमारे 85 हजार रुपये दंड आकारण्यात आला. काही व्यावसायिकांनी स्वत:जवळील प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा गुपचूप न वापरता स्वत:हून पालिकेत जमा केला. नागरिक व व्यापाऱ्यांना स्वत:कडील प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा पालिकेकडे प्रक्रिया व पुनर्वापराकरिता देण्यासाठी घंटागाड्यांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. 

फलटणला 350 किलो जप्त  
फलटण पालिकेने सहा व्यापाऱ्यांकडून 350 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. दंड म्हणून संबंधित दुकानदारांकडून 30 हजार रुपये वसूल करण्यात आले. शासनाच्या प्लॅस्टिक बंदी निर्णयाची माहिती लोकांना होण्यासाठी प्रशासनाने सुरवातीला व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर काल शहरातील सहा व्यापाऱ्यांकडे एकूण 350 किलो प्लॅस्टिक पिशव्या मिळाल्या. त्या जप्त करण्यात आल्या. 

वाई पालिका मात्र सुस्त  
वाई शहरात अद्याप दंडात्मक कारवाई करण्यात येत नसली तरी कारवाईच्या भीतीने व्यापारी व किरकोळ विक्रेते ग्राहकांना प्लॅस्टिक पिशवी देण्याचे टाळत आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लॅस्टिकचा वापर कमी केल्याचे चित्र आहे. पालिकेने एका व्यापाऱ्याला दंड केल्याची पावती "सोशल मीडिया'वर "व्हायरल' झाली होती. मात्र, अशी कोणतीही कारवाई पालिकेने केली नाही. "ती पावती' खाडाखोड करून खोडसाळपणा कोणीतरी केल्याचे स्पष्ट झाले. काही दुकानांतून, तसेच रस्त्यांवर ठिकठिकाणी प्लॅस्टिक दिसून येत आहे. 

कऱ्हाड- खंडाळ्यात जागृती  
कऱ्हाडमध्ये व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडील प्लॅस्टिक जमा करण्याचे आवाहन पालिकेने केले. दोन दिवसांची मुदत देऊन त्यानंतर कारवाई करण्याचा आराखडा पालिका आखत आहे. कायदा लागू झाला त्यादिवशी संस्था व नागरिकांच्या रॅलीत दोन ट्रॉली प्लॅस्टिक जमा झाले. 

बंदीनंतर दुसऱ्या दिवशी खंडाळा येथील आठवडा बाजारात येथील नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांना सूचना देऊन प्रबोधन केले. याचप्रमाणे शहरातील प्रत्येक दुकानदारांसही या बंदीबाबत सूचना केल्या. नगरपंचायतीचे मुख्यधिकारी दीर्घरजेवर असल्याने कारवाईसाठी कोणच पुढे येत नाही का? अशी चर्चा नागरिकांत आहे. 

कोरेगावला आधी जागृती मग कारवाई  
प्लॅस्टिकबंदीचा परिणाम कोरेगावमध्ये बऱ्यापैकी दिसू लागला आहे. ग्राहकांकडून प्लॅस्टिक पिशव्यांची मागणी होताना दिसत नाही. नगरपंचायतीने अद्याप कारवाईची एकही पावती फाडली नाही. "जनजागृतीचे नियोजन झाले असून, आधी प्रबोधन मग कारवाई' अशा पद्धतीने आम्ही प्लॅस्टिक बंदीला सामोरे जात आहोत, अशी माहिती नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली. कारवाईसाठी कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्याचे नियोजन आहे. पदाधिकारी व नगरसेवक आपापल्या वॉर्डमध्ये व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन करणार आहोत, असेही श्री. बर्गे यांनी स्पष्ट केले. 

रहिमतपूर, म्हसवड, पाटणला भोपळा  
रहिमतपूर पालिकेने व्यापाऱ्यांची बैठक घेऊन प्लॅस्टिक पिशव्या व इतर साहित्य न वापरण्याबाबत जनजागृती केली, तसेच प्रसारमाध्यमांतून कारवाईची माहिती लोकांना दिली. रहिमतपूर व म्हसवड पालिका क्षेत्रात अद्याप एकही दंडात्मक कारवाई झाली नाही. "बंदी निर्णयाबाबत जागृतीवर भर देण्यात आला असून, नागरिकांना प्लॅस्टिक न वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे,' असे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले. प्रथम जनजागृती व नंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चार दिवसांत पाटण शहर व तालुक्‍यात कोणतीही कार्यवाही झाली नाही. मल्हारपेठ, मोरगिरी, ढेबेवाडी, तारळे, कोयनानगर, तळमावले व पाटण या बाजारपेठांच्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. 

लोणंदला दवंडीतून जागृती  
लोणंद शहरात बंदीच्या आदेशाच्या अनुषंगाने दवंडी देण्यात आली. व्यापारी, दुकानदार, छोटे-मोठे स्टॉलधारक यांची बैठक घेऊन प्लॅस्टिकच्या अनुषंगाने जागृती करण्यात येईल. त्यानंतर कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. बहुतांशी व्यापाऱ्यांनी कॅरिबॅगा वापर स्वतःहून बंद केला आहे. खाकी व पांढऱ्या रंगाच्या कागदी पिशव्यांचा वापर व्यवहारात वाढल्याचे दिसते. वडूज नगरपंचायत प्रशासनाने गेल्या काही दिवसांत प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक बंदीचा चांगलाच धसका घेतला होता. नागरिकांतून प्लॅस्टिक बंदी निर्णयाचे स्वागत होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com